HW News Marathi
महाराष्ट्र

‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप’ हा आत्मनिर्भर भारतातील महत्त्वाचा उपक्रम! – मुख्यमंत्री

मुंबई । रस्ते हे विकासाचा मार्ग असतात, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप’ (Formula-E World Championship) हा आत्मनिर्भर भारत उपक्रमातील महत्त्वाचा भाग ठरेल, म्हणूनच या स्पर्धा महाराष्ट्रातही व्हाव्यात, असे निमंत्रणही शुक्रवारी (१३ जानेवारी) येथे दिले.

भारतात पहिल्यांदाच आयोजित केल्या जाणाऱ्या फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप या ई व्हेईकल्स च्या कार रेसमधील कारचे मुख्यमंत्री शिंदे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, तसेच तेलंगणाचे नगर विकास मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते येथे अनावरण करण्यात आले. यासाठी गेटवे ऑफ इंडियांच्या प्रांगणात शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार अनावरण सोहळ्यास तेलंगणाच्या नगर विकास विभागाचे सचिव अरविंद कुमार, तसेच ग्रीनको समूहाचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चलमाशेट्टी आदी उपस्थित होते. तेलंगणामधील हैद्राबाद येथे ११ फेब्रुवारीला ही ‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप कार रेस’ पार पडणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी या ‘ई-व्हेईकल्स वर्ल्ड चॅम्पियनशिप’ या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, देशात होणाऱ्या पहिल्या अशा उपक्रमाची सुरुवात मुंबईतून होत आहे, याचे समाधान आहे. मुंबई ही देशाची शान आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात हा सोहळा होतो आहे, यालाही वेगळे स्थान आहे. नुकतीच जी-२० ची आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची बैठक इथे झाली. त्यांना परिसर खूप आवडला होता. अशी ही फार्म्युला- रेस महाराष्ट्रातही व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी इथे रस्त्यांचे उत्तम जाळे आहे. नुकतेच आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खुला केला आहे. हा महामार्ग या रेससाठी उत्तम ठरेल. त्यामुळे यात सहभागी होणारेही खुश होतील, असे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धा आयोजकांना आपल्या भाषणात दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भूपृष्ठ वाहतूक मंत्री गडकरी यांच्या रस्ते विकास आणि पायाभूतसुविधा क्षेत्रातील कामांची प्रशंसाही केली. त्यांच्यामुळेच मुंबईत ५५ उड्डाण पुल उभे राहिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. इथे उद्योगांसाठी अनेक पोषक घटक उपलब्ध आहेत. मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि एक खिडकी योजना सारख्या सवलती आहेत. महाराष्ट्रात अनेक रस्ते प्रकल्पांचे काम सुरु आहे. आम्ही वेगाने या महाराष्ट्राने प्रगतीपथावर नेत आहोत. यात केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांसह केंद्रातील अनेक मंत्र्यांचे सहकार्य मिळत आहे. या सहकार्यातूनच आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचे आहे. फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, आपल्याला ई-व्हेईकल्सच्या वापरावर भर द्यायचा आहे. त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करायची आहे. याशिवाय ईथेनॉलसारख्या ग्रीन फ्युईलच्या वापरालाही प्रोत्साहन द्यायचे आहे. यातून आपल्या इंधनाची आयात कमी करायची आहे. पुढे जाऊन फाईव्ह ट्रीलीयन ईकॉनॉमीचे उद्दिष्टही गाठायचे आहे. यात आपला ॲटोमोबाईल इंडस्ट्रीजचा सर्वात मोठा वाटा असेल. कारण आज हेच क्षेत्र सर्वाधिक जीएसटी भरते. हेच क्षेत्र सर्वाधिक रोजगार निर्मिती करते. आपल्याला अधिकाधिक ई-व्हेईकल्स, कार-ट्रक्सची निर्मिती करायची आहे. आपल्याकडे सौर ऊर्जा मुबलक आहे. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही याच साऱ्या गोष्टींवर भर असतो. म्हणूनच येत्या काळात आपल्याला ई-व्हेईकल्सचा वापर आणि त्यांच्या निर्मितीवर भर द्यायचा आहे. आपल्या आत्मनिर्भर भारताच्या उद्दीष्टांपैकी एक असे हे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून आपण ही स्पर्धा आयोजित करत आहोत.

सुरुवातीला या फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पिनयनशिप विषयीही माहिती सादर करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविडमुळे संसदेचे अधिवेशनच रद्द करणाऱ्या मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार ? सचिन सावंत

News Desk

महाबीजने कमावले ७० कोटी

News Desk

Shame on ‘The Quint’! अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहिता पेक्षा मोठे कधीच असू शकत नाही.

News Desk