Site icon HW News Marathi

पोंभुर्णा तालुक्‍याच्‍या विकासाची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार! – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर  । एकेकाळी मागास व दुर्लक्षित समजला जाणारा पोंभुर्णा तालुका शनिवारी (१२ नोव्हेंबर) विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आला असून या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्‍याने मला याचा अभिमान व आनंद आहे. नागरिकांनी विकासासंबंधी जी मागणी केली ती मी प्राधान्‍याने पूर्ण केली. गंगापूर टोक येथे आमदार निधीतून नाली बांधकामासाठी १० लक्ष रू. निधी तर सभागृह बांधकामासाठी १० लक्ष रू. निधी उपलब्‍ध केला आहे. आदिवासी विकास विभागाच्‍या निधीतुन रस्‍त्‍यासाठी निधी उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत. हा परिसर धान उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या परिसर आहे. यावर्षी धानाला बोनस मिळावा यासाठी आपण प्रयत्‍न केले व लवकरच धानाला बोनस मिळणार आहे. नागरिकांच्‍या मुलभूत गरजांसह शेतक-यांचे प्रश्‍न, आरोग्‍याचे प्रश्‍न याला प्राधान्‍य देत हा परिसर अधिक विकसीत होईल यादृष्‍टीने आपण प्रयत्‍नांची शर्थ करू, असे प्रतिपादन राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मस्‍त्‍यव्‍यवसाय तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले.

पोंभुर्णा तालुक्‍यातील जुनगांव ते गंगापूर टोक रस्‍त्‍यावर लान नदीवर करण्‍यात आलेल्‍या मोठया पुलाच्‍या बांधकामाचे लोकार्पण सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, अल्‍का आत्राम, उपकार्यकारी अभियंता टांगले, पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद देशमुख, माजी पंचायत समिती सदस्‍य गंगाधर मडावी, माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, तहसिलदार  कनवाडे, नगर पंचायत अध्‍यक्ष सुलभा पिपरे, उपाध्‍यक्ष अजित मंगळगिरीवार, ओमदेव पाल, अजय मस्‍के आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, पोंभुर्णा तालुक्‍यात विकासाची दीर्घ मालिका आपण तयार केली आहे. आदिवासी महिलांची राज्‍यातील पहिली कुक्‍कुटपालन संस्‍था, पंचायत समितीच्‍या नविन इमारतीचे बांधकाम, पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालय, तालुक्‍यासाठी स्‍वतंत्र वनपरिक्षेत्राची निर्मीती, भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क, टूथपिक केंद्र, बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट, कारपेट निर्मीती केंद्र, अगरबत्‍ती उत्‍पादन केंद्र, स्‍टेडियमचे बांधकाम, नगर पंचायतीची आकर्षक इमारत अशा विविध विकासकामांसह पोंभुर्णा तालुक्‍यासाठी स्‍वतंत्र एमआयडीसी स्‍थापन करण्‍याकरिता आपण प्रयत्‍नशील आहोत. जुनगांव ते गंगापूर टोक या रस्‍त्‍यावर लान नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करण्‍याबाबत आपण जनतेला शब्‍द दिला होता. १४ कोटी रू. किंमतीचा हा पुल शनिवारी बांधून पूर्ण झाला आहे. शनिवारी या पुलाच्‍या लोकार्पणाच्‍या निमीत्‍ताने हा शब्‍द पूर्ण होत आहे याचा मला मनापासून आनंद आहे. विकासाची ही प्रक्रिया अशीच निरंतर सुरू राहील, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. यावेळी देवराव भोंगळे, अल्‍का आत्राम आदींची समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Exit mobile version