Site icon HW News Marathi

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणा-या महिलेची साता-यात आत्महत्या

सातारा | घरगुती वादातून सैन्य दलातल्या जवानाच्या पत्नीने विष प्राशन करून राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना साता-यात घडली आहे . शनिवारी रात्री सातारच्या स्वाती निंबाळकर (रा.कोंडवे, ता.सातारा) यांनी आपल्या रहात्या घरी आत्महत्या केली. स्वाती या मुंबई पोलीस दलात कार्यरत होत्या.

पोलीस यांचे दोन वर्षापूर्वी लखन निंबाळकर या सैन्य दलातील जवानाशी लग्न झाले होते. त्या मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या तर लखन यांनाही सुट्टी असल्यामुळे त्या चार दिवस सुट्टी घेऊन आपल्या सासरी कोंडवे येथे आल्या होत्या. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्वांनी जेवण केले. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. यावेळी अचानक स्वाती यांनी विष प्राशन केले. हा प्रकार पती लखन यांच्या निदर्शनास आल्यानंतर स्वाती यांना त्यांनी रात्री अकराच्या सुमारास तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात पोलिसांनी स्वाती यांचा जबाब नोंदविला. ‘टेन्शनमुळे मी विषारी औषध पिले असून, याला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा जबाब स्वाती यांनी यावेळी पोलिसांकडे दिला. रात्री बारापर्यंत स्वाती यांची प्रकृती चांगली होती. मात्र, साडेबारानंतर अचानक प्रकृती चिंताजनक बनली. मध्यरात्री दीडच्या सुमारास उपचार घेत असताना स्वाती यांचा मृत्यू झाला.

परंतु, स्वाती यांच्या मृत्यू नंतर या आत्महत्येला सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्या नातेवाइकांनी नकार दिला आहे. परंतु, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करू, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन रविवारी दुपारी स्वाती यांच्यावर कोंडवे येथे अंत्यसंस्कार केले. स्वाती यांना ११ महिन्यांचा मुलगा आहे.

Exit mobile version