Site icon HW News Marathi

ह.व्या.प्र. मंडळाच्या क्रीडा विद्यापीठासाठी शासनस्तरावर लवकरच समिती! – उपमुख्यमंत्री

अमरावती | क्रीडा क्षेत्राचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जगभर विविध खेळ वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत आहेत. त्यामुळे देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी अद्ययावत व प्रभावी प्रशिक्षणाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी लवकरच शासनाकडून समिती गठित करुन निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (21 ऑगस्ट) येथे दिली.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसरातील मेजर ध्यानचंद इनडोअर स्टेडियमचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार रामदास तडस, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, दीप्तीताई चौधरी,  श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉ.  श्रीकांत चेंडके, सचिव डॉ.  माधुरीताई चेंडके आदी उपस्थित होते.

डणवीस म्हणाले की, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या गौरवशाली इतिहास लाभलेल्या संस्थेने क्रीडा उपक्रमांबरोबरच सामाजिक बांधीलकीचे उपक्रमही सातत्याने राबविले. खेळ व व्यायाम एवढेच मर्यादित क्षेत्र न ठेवता मानवतेचा विचार करणारी संस्था आहे. संस्थेचे क्रीडा विद्यापीठ झाले पाहिजे, अशी मागणी आहे. जगभर खेळ विविध प्रकारे विकसित होत असताना व अनेकविध क्रीडाविषयक संधी उपलब्ध होत असताना देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे संस्थेचे विद्यापीठ करण्याबाबत लवकरच एक समिती स्थापन करून सकारात्मक कार्यवाही करू. त्याचप्रमाणे, संस्थेचे वसतिगृह तसेच इतर उपक्रमांसाठी निश्चित सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

Exit mobile version