HW News Marathi
महाराष्ट्र

विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे, झेपेल तर पुढे जा!

मुंबई। ‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत. बाळासाहेबांच्या एखाद्या जुन्या भाषणाची जशीच्या तशी ‘कॉपी’ वाचून दाखवली गेली. मग त्यात मंदिराच्या आरत्या, मुसलमानांचे नमाज, बांगलादेशींची हकालपट्टी हे विषय जसेच्या तसे आलेच आहेत. वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा, सामनाच्या अग्रलेखातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टीका केली आहे.

सामनाच्या आजचा अग्रलेख

देशात शिरलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकलून द्या. नव्हे हाकलायलाच पाहिजे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण त्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाने झेंडाच बदलावा ही गोष्ट गमतीची आहे. दुसरी गंमत अशी की, त्यासाठी एक नव्हे, दोन दोन झेंड्यांची योजना करणे हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे. राज ठाकरे व त्यांच्या 14 वर्षे जुन्या पक्षाने मराठी हा मुद्दा घेऊन आधी पक्षाची स्थापना केली, पण आता त्यांचा पक्ष हिंदुत्ववादाकडे वळला असे एकंदरीत दिसते. आडवळणाने वळत आहे असे म्हणणे सोयीचे ठरेल. शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर भरपूर काम करून ठेवले आहे. त्यामुळे मराठी मनास साद घालून हाती काहीच लागले नाही. लागण्याची चिन्हे नाहीत. भारतीय जनता पक्षाला हवे आहे म्हणून राज ठाकरे यांनी ‘हिंदू बांधव, भगिनी, मातांनो…’ अशी साद घातली असा टीकेचा सूर आहे. येथेही हाती काही लागेल याची शक्यता कमीच आहे. शिवसेनेने प्रखर हिंदुत्वाच्या विषयावरही देशभरात मोठे जागरण व काम केले आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेने हिंदुत्वाचा भगवा रंग कधीच सोडला नाही. हा रंग तसाच राहील. त्यामुळे दोन झेंडे निर्माण करूनही राज यांच्या झेंड्यास वैचारिक पाठबळाचा दांडा मिळण्याची शक्यता दिसत नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. यास रंग बदलणे कसे म्हणाल? त्याबाबत आक्षेप कमी व पोटदुखी जास्त. भाजप किंवा इतरांनी अगदी मेहबुबापासून इतर कुणाशीही निकाह लावला तरी चालतो, पण ही राजकीय व्यवस्था इतर कोणी केली की ते पाप ठरते. आम्ही सरकार स्थापन केले हे पाप नसून समाजकार्य आहे. सरकारची ध्येय, धोरणे स्पष्ट आहेत. सरकार

राज्यघटनेच्या कलमांनुसार

चालवले जाईल व अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शेतकरी, कष्टकऱ्यांचे कल्याण, सुरक्षा अशा समान नागरी कार्यक्रमावर पुढे जाईल. तीन पक्षांच्या विचारधारा वेगळ्या असतील, पण ‘राज्याचे आणि जनतेचे कल्याण करण्यासाठीच सरकार राबवायचे’ यावर तिघांचे एकमत आहे. भारतीय जनता पक्षाला गेल्या पाच वर्षांत जे करता आले नाही ते महाविकास आघाडी सरकारने पन्नास दिवसांत केले आहे. सरकारला लोकांचे पाठबळ आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार काही पडत नाही याची खात्री पटल्याने पुन्हा जुनीच प्यादी रंग बदलून पटावर नाचवली जात आहेत. संसदीय लोकशाहीत प्रत्येक राजकीय पक्ष आपापले अजेंडे व झेंडे घेऊन काम करीत असतो, पण शिवसेनेसारखा पक्ष ‘एक झेंडा एक नेता’ घेऊन पंचावन्न वर्षे काम करतो आहे. ही एक तपस्या आहे व त्यागही आहे. सत्तेसाठी शिवसेनेने रंग बदलला अशी भाषा करणे हे अकलेची दिवाळखोरी निघाल्याचे लक्षण आहे. शिवसेनेने रंग बदलला असे विचारणाऱ्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावरील मुखवटे व चेहऱ्यावरचा अनेक रंगी मेकअप तपासून घ्यायला हवा. भारतीय जनता पक्षाने 2014 साली व 2019 साली सरड्याप्रमाणे रंग बदलल्यानेच, भगवा रंग कायम ठेवून शिवसेना महाविकास आघाडीत सामील झाली व आता शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत शिरूनही ‘बाणा’ बदलायला तयार नाही याची खात्री पटताच हिंदुत्ववादी मतांत विभाजन करण्याचा डाव रचला गेला आहे. अर्थात गेल्या 14 वर्षांत राज ठाकरे यांना ‘मराठी’ प्रश्नावर काही भव्य काम करता आले नाही व आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाग्य आजमवता येईल काय? याबाबत शंकाच जास्त आहेत. ‘मनसे’प्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. त्यांनी काल सांगितले की, नागरिकत्व कायद्याला आता आपला पाठिंबा असून या कायद्याच्या समर्थनासाठी आपण मोर्चा काढणार आहोत, पण एक महिन्यापूर्वी

त्यांची नेमकी वेगळी व उलटी

भूमिका होती. श्री. राज ठाकरे यांनी या कायद्यास तळमळीने विरोध केला होता. आर्थिक मंदी-बेरोजगारी अशा गंभीर प्रश्नांवरून देशाचे लक्ष वळविण्यासाठी अमित शहा या कायद्याची खेळी करीत आहेत व ही खेळी यशस्वी होत असल्याचे त्यांचे मत होते, पण फक्त एकाच महिन्यात राज ठाकरेही त्याच खेळीचे यशस्वी बळी ठरले असून त्यांनी ‘सीएए’ कायद्याच्या पाठिंब्याचा नवा झेंडा खांद्यावर घेतला आहे. दोन झेंडे का? हे यानिमित्ताने स्पष्ट झाले. एन.आर.सी. व सी.ए.ए. कायद्यावरून देशात प्रचंड गोंधळ उडाला आहे व सरकारला हाच गोंधळ उडवून राजकीय लाभ मिळवायचा आहे. या कायद्याचा फटका फक्त मुसलमानांनाच नाही, तर 30 ते 40 टक्के हिंदूंनाही बसेल, पण हे सत्य लपवून ठेवले जात आहे. आसाम किंवा ईशान्येकडील राज्यांत तर हाहाकार माजला आहे. माजी राष्ट्रपतींच्या नातेवाईकांना राष्ट्रीय जनगणनेतून वगळले गेले. कुठे नवऱ्याचे नाव आहे तर बायकोचे नाही. भावाचे नाव आहे तर बहिणीचे नाही. कारगिल युद्धात शौर्यचक्र मिळविलेल्या, 30-35 वर्षे लष्करात सेवा बजावलेल्या नागरिकांनाही या कायद्याने ‘उपरे’ ठरवले आहे. सैन्यात सेवा बजावून निवृत्त झालेल्या हजारोंना ‘परदेशी’ ठरवले गेले अशी या कायद्याची गत झाली आहे. हिंदू किंवा मुसलमान एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. राज ठाकरे यांनी एक महिन्यापूर्वी असे सांगितले होते की, ”आपल्या देशात 135 कोटी लोक राहात आहेत. या लोकांचा भार सांभाळण्यात देश कमी पडतोय. अशा परिस्थितीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे बाहेरच्या लोकांना आपण हिंदुस्थानात घेत आहोत. त्यांची व्यवस्था कोण करणार? इथली व्यवस्था कोसळली आहे. जे इथले मुस्लिम नागरिक आहेत त्यांना असुरक्षित वाटण्याचे कारण नाही. मात्र बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळमधून किती मुस्लिम आले हे तपासून बघायला हवे,” असे ‘पारदर्शक’ मत एक महिनाआधी व्यक्त करूनही आता मोर्चे वगैरे काढण्याची योजना ही प्याद्यांना कुणीतरी हलवत असल्याचेच द्योतक आहे. शिवसेनेच्या बाबतीत पोटदुखी हा एक प्रकार येथे आहेच. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱया मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत. बाळासाहेबांच्या एखाद्या जुन्या भाषणाची जशीच्या तशी ‘कॉपी’ वाचून दाखवली गेली. मग त्यात मंदिराच्या आरत्या, मुसलमानांचे नमाज, बांगलादेशींची हकालपट्टी हे विषय जसेच्या तसे आलेच आहेत. वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळय़ांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा!

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केवळ सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे!”, भाजपचा सरकारवर निशाणा

News Desk

विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला !

News Desk

राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत, राऊतांची धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया 

News Desk