Site icon HW News Marathi

मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने निघेल, कोणतीही विध्वंसक घटना घडणार नाही! – अजित पवार

मुंबई | “मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने निघेल यात कोणतीही विध्वंसक घटना घडणार नाही”, अशा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले. ‘महाराष्ट्राद्रोही विरोधात हल्लाबोल’ या महामोर्चाच्या अनुषंगाने आज (15 डिसेंबर) अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडी व मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीच्या महामोर्चासंदर्भात बोलतान अजित पवार म्हणाले, “मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने निघेल यात कोणतीही विध्वंसक घटना घडणार नाही, लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना ज्याप्रमाणे मोर्चा निघतो त्याप्रकारचे स्वरूप या मोर्चाचे असेल. राज्य सरकारकडे या मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली आहे अद्याप परवानगी मिळालेली नसली तरी ती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य सरकारचा मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेला भोंगळ कारभार, छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांकडून होणारी बेताल वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी अशा विविध समस्यांविषयी हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही त्यामुळे राज्यातून ज्या लोकांना या मोर्चात सहभागी व्हायच आहे. त्यांनी निश्चितपणे सामील व्हावे, असे आवाहन अजित पवारांनी राज्यातील तमाम जनतेला केले.
बैठकीसाठी नेत्यांनी लावली हजेरी
या बैठकीला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप, कॉंग्रेसचे नेते नसीम खान, शिवसेना आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना आमदार सचिन अहिर, माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रईस शेख, माकपचे प्रकाश रेड्डी, सीपीआयचे मिलिंद रानडे, शेकापचे राजू कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Exit mobile version