Site icon HW News Marathi

महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करावे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई । केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल (Sarbanand Sonowal) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंत, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, मुंबई मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीत सैनी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लोथल येथे साकारत असलेल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे दालन असावे आणि त्याठिकाणी शिवकालीन आरमार विषयी चित्रमय प्रदर्शनासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सागरमाला अंतर्गत सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करतानाच नविन प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून मागणी करण्यात येईल. महाराष्ट्रात पुढील दीड वर्षांत रोरो सेवेचे चार प्रकल्प सुरू करण्यात येतील त्यामध्ये मुंबई ते मोरा, मुंबई ते काशीद, मुंबई ते दिघी, मुंबई ते रेवस कारंजा यांचा समावेश आहे.

रोरो सेवेसाठी बंकर फ्युलला लावला जाणारा वॅट कमी करण्यात यावा तसेच जुन्या प्रवाशी बोटींचे अद्ययावतीकरण करण्यात यावे, पर्यावरणपूरक बोटींची समावेश याविषयी देखील चर्चा करण्यात आली.

Exit mobile version