HW News Marathi
महाराष्ट्र

भेटी लागे जीवा…

पूनम कुलकर्णी | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याचे पंढपूर येथील पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढ महिन्यातल्या एकादशीला सर्व वारकरी पंढपूरमध्ये दाखल होतात. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरीनामाच्या जय घोषात मैलो मैल चालत असलेल्या आणि पांडुरंगाच्या भेटीला आसुसलेल्या वारक-यांसाठी ‘आजी सोनियाचा दिनू’ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या महिन्याभरापासून पंढपूरचा रस्ता धरलेल्या पांडुरंगाच्या भेटीची आस धरुन देह भान विसरलेले वारकरी आज विठ्ठल दर्शन घेणार आहेत.

पांडुरंगाच्या या वारीला 700 वर्षांचा अखंड इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज यांनीही वारीला सरंक्षण दिले होते. तर हल्ली दरवर्षी विठ्ठलाच्या प्रथम पुजेचा मान राज्याचा मुख्यमंत्र्यांना दिला जातो. आषाढी एकादशीचा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखोंच्या संख्येने वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात आणि चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.

आषाढीच्या दिवशी पंढरपुरमध्ये शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिरांची पालखी येते. आषाढी वारीला इतिहासात वारकर-यांनी सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरीत वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो अशी वारक-यांची श्रद्धा आहे.

वर्षातून येणा-या दोन महत्वाच्या एकादशींपैकी एक म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात. आषाढ महिन्यातील एकादशीला फार पवित्र मानण्यात येते. म्हणून या एकादशीला महाएकादशी म्हणतात. या महिन्यातील हा दिवस वारक-यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस असतो. पांडुरंगाच्या भेटीसाठी पावसा-पाण्यात भिजत-चिंबत जाणा-या वारकरी भक्तांचा दिंडी सोहळा अत्यंत मनोरम असा असतो. महाराष्ट्रातून लाखो वारक-यांची “चंद्रभागे”च्या काठी जत्रा भरते. सर्व जाती-जमातींना भक्तिप्रेमाच्या जोरावर परमेश्वराचा मार्ग मोकळा करून देणारा व परमार्थाच्या प्रांतात लोकशाहीचे रूप विकसित करून देणारा वारकरी संप्रदाय म्हणजे विकसित वैष्णवधर्मच असे म्हणता येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात १५ नवे कोरोना पॉझिटिव्ह, पुण्यात एकूण आकडा १९०

News Desk

OBC Reservation : मध्य प्रदेशात दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Aprna

पर्यटकांच्या सोयीसाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसर आकर्षक करणार! – आदित्य ठाकरे

News Desk