Site icon HW News Marathi

पाणी हक्कासाठी लढा देणार्‍या वयोवृद्ध आनंदराव पाटील यांना जयंत पाटलांनी दिले आश्वासन 

मुंबई | २०२३ च्या सुरुवातीला तुम्हाला पाणी मिळेल अशी व्यवस्था करू आणि तुमच्याच हस्ते नारळ वाढवून त्या पाण्याचे पूजन करू असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाणी हक्कासाठी लढा देणार्‍या वयोवृद्ध आनंदराव पाटील यांना दिले. कागल मतदारसंघाच्या चिकोत्रा प्रकल्पामध्ये समन्यायी तत्वावर पाणी वाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याबाबत मंगळवारी मंत्रालयात बैठक पार पडली. या पथदर्शी प्रकल्पामध्ये चिकोत्रा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील ५२ गावांचा समावेश करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली जाईल व मंत्रीमंडळात ठराव करुन मान्यतेसाठी केंद्रसरकारकडे पाठवण्यात येईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

या भागातील नागरिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने चिकोत्रा धरणालगतच्या गावांमध्ये प्राथमिक स्तरावर टप्प्याटप्प्याने पाईपलाईन द्वारे पाणी उपलब्ध करून देण्याची संकल्पना मंत्री जयंत पाटील यांनी मांडली. समन्यायी पाणी हक्क परिषदेच्या सदस्यांनाही या संकल्पनेला समर्थन दिले.

नववर्षाच्या सुरवातीला या भागात पाणी उपलब्ध होईल या गतीने काम करावे अशा सुचना मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाद्वारे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे योग्य नियोजन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी समन्यायी पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष आनंदराव पाटील, सहसचिव मोहन पाटील, इतर पदाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Exit mobile version