Site icon HW News Marathi

टिटवाळा रेल्वे स्थानकात महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म; आई आणि बाळ दोघेही सुखरूप

मुंबई । मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकात (Titwala Railway Station) कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्येच एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. प्रीती वाकचौरे असे गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या मातेचे नाव असून बाळासह आई सुखरूप असल्याची माहिती टिटवाळा लोहमार्ग पोलिसांनी दिली.
बाळाला जन्म देणारी प्रीती वाकचौरे ही महिला शहापूर तालुक्यातील आटगाव परिसरात राहणारी आहे. ती आटगाव रेल्वे स्थानकातून  कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये आज पहाटेच्या सुमारास जात होत्या. विशेष म्हणजे आटगाव येथून लोकलने मुंबईच्या दिशेने रुग्णलयात जात असतानाच, टिटवाळा रेल्वे स्थानकात तिला प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यावेळी महिला डब्यातील महिला प्रवासी यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली.
महिला जीआरपी आणि आरपीएफ रेल्वे पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. महिला प्रवासी, महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे टिटवाळा स्थानकात तिला मदत करण्यासाठी लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. सध्या नवजात बाळाची प्रकृती सध्या स्थिर असून आईसह बाळाला पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Exit mobile version