Site icon HW News Marathi

कोरोना काळात नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा! – सुधीर मुनगंटीवार

मुंबई । सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमार बांधवांनंतर आता गोड्या पाण्यातील तलाव किंवा जलाशयात मासेमारी (Reservoir Fishing) करणाऱ्या मच्छीमार बांधवानादेखील राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सन २०२०-२१ या कोरोना काळातील नुकसान लक्षात घेऊन तलाव ठेका माफ करण्याचा शासनाचा आदेश नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे मासेमारी करणाऱ्या बांधवांसाठी दिलासा मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

मच्छीमार बांधवांना आर्थिक दृष्ट्या बळ देण्यासाठी राज्य शासन संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे असून त्यांच्या अडचणींचा संवेदनशीलपणे विचार करुन सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. मागील पावसाळी अधिवेशनात मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी  यासंदर्भात आश्वासन दिले होते ; त्याची पूर्तता या निर्णयामुळे झाली आहे.  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घोषित टाळेबंदीमुळे मत्स्यव्यावसायिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता राज्यातील मच्छीमार/ मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांची सन 2021-22 या वर्षात तलाव ठेका रक्कम भरणा केलेल्या तलावांची ठेका रक्कम सन 2023-24 या वर्षात समायोजित करण्यास व सन 2021-22 या वर्षात तलाव ठेका रक्कम भरणा करू शकलेले नाहीत अशा मच्छीमार/ मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांची सन 2021-22 या वर्षाची तलाव ठेका रक्कम माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील गोड्या पाण्याच्या तलावात किंवा जलाशयात मासेमारी करणाऱ्या बांधवांना सहकारी संस्थांच्या सभासदांना लाभ होणार आहे.

Exit mobile version