Site icon HW News Marathi

राज्यात सर्वसामान्यांना न्याय देणारे शासन कार्यरत! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे । भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याणजवळील श्री मलंगगडच्या यात्रेनिमित्ताने (Shri Malang Gad Yatra) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी श्री मलंगगडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, डॉ बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी मलंगगडाच्या पायथ्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, स्व. आनंद दिघे साहेबांनी या मलंग उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेले उपक्रम, कार्य यापुढेही सुरु ठेवू. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मलंगगडावर येण्याचे भाग्य लाभले.

सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आपल्या शुभेच्छांमुळे कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. राज्यात कोविडमुळे निर्बंध होते, सगळे बंद होते. मात्र आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण उत्सव मोठ्या जोमात साजरे करण्यात येत आहेत. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करत आहोत. देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या सहकार्याने विकासात योगदान देण्याचे काम करत आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Exit mobile version