HW News Marathi
मुंबई

शहरी भागातील ६ उड्डाणपुलांखाली होणार अभिनव उद्याने

मुंबई । पालिका क्षेत्रातील पर्यावरणाचे संवर्धन होण्यासह शहराचे सुशोभिकरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी पालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न हेतुतः करित असते. पालिकेच्या उद्यानांमध्ये, रस्त्यांच्या कडेला व विविध सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणारी झाडे, हा देखील याच प्रयत्नांचा भाग असतो. या अनुषंगाने आता एक पाऊल पुढे टाकत पालिकेच्या उद्यान विभागाने शहर भागातील ६ उड्डाणपुलांखाली अभिनव उद्याने विकसित करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामध्ये ३ उड्डाणपूलांखालील ३१ हजार २१३ चौरस फुटांच्या जागेत विविध सोयी सुविधा असणारी ३ उद्याने साकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तर उर्वरित ३ उद्याने ही ‘व्हर्टीकल गार्डन’ अर्थात ‘उभे उद्यान’ या प्रकारातील असणार असून ती उड्डाणपूलांच्या खालील १९ खांबांवर फुलणार आहेत. या उद्यानांमध्ये विविध रंगांच्या एलईडी दिव्यांची आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. या ६ अभिनव उद्यांनांमुळे उड्डाणपूलांखालील परिसर हिरवागार व आकर्षक दिसण्यासह पर्यावरणाचे जतनही काही प्रमाणात साधले जाणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

शहर भागातील ‘एफ दक्षिण’ विभागात असणारा हिंदमाता उड्डाणपूल, ‘जी दक्षिण’ विभागातील एलफिन्स्टन उड्डाणपूल व डॉ. ऍनी बेझंट मार्गावरील उड्डाणपूल; या ३ उड्डाणपूलांच्या खालील असणा-या एकूण ३१ हजार २१३ चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत होणा-या अभिनव उद्याने केली जाणार आहेत एफ दक्षिण’ विभाग – हिंदमाता उड्डाणपूलाच्या खाली असणा-या सुमारे १२ हजार ९१६ चौरस फुटांच्या जागेत उद्यानासह सौंदर्यीकरण केले जाणार आहे. याअंतर्गत प्रामुख्याने छोटा बगीचा, विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. याचसोबत याठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली ‘स्केटिंग रिंग’ हे या उद्यानाचे महत्त्वाचे आकर्षण असणार आहे. या ‘स्केटिंग रिंग’ मुळे परिसरातील लहान मुलांना व युवकांना ‘स्केटिंग’ या क्रीडा प्रकाराचा सराव करण्यासाठी एक नवीन ठिकाण उपलब्ध होणार आहे.

तर ‘जी दक्षिण’ विभाग – परळ परिसरातील सेनापती बापट मार्गावर एक उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाखाली असणा-या सुमारे १० हजार ७६३ चौरस फुटांच्या जागेत उद्यान साकारले जाणार आहे ‘जी दक्षिण’ विभाग – वरळी परिसरातील ‘खान अब्दुल गफ्फारखान मार्ग’ हा जिथे डॉ. ऍनी बेझंट मार्गाला मिळतो, त्याठिकाणी म्हणजेच डॉ. हेडगेवार चौक येथे डॉ. ऍनी बेझंट मार्गावरुन जाणारा उड्डाणपूल आहे. याच उड्डाणपूलाच्या खालील सुमारे ७ हजार ५३४ चौरस फुटांच्या जागेत एक उद्यान साकारले जाणार आहे. या उद्यानाच्या सभोवताली विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई देखील केली जाणार आहे. शहर भागातील ‘बी’ विभागात असणारा ‘कुतूब-ए-कोकण मगदूमअली माहिमी उड्डाणपूल’ (जे.जे. फ्लायओव्हर), ‘इ’ विभागातील ‘वाय ब्रिज’ (खडा पारशी उड्डाणपूल) व ‘जी उत्तर’ विभागातील कवि केशवसुत उड्डाणपुल; या ३ उड्डाणपूलांच्या खालील १९ खांबांवर ‘उभी उद्याने’ अर्थात ‘व्हर्टीकल गार्डन’ साकारण्यात येणार आहेत ‘बी’ विभाग – ‘कुतूब-ए-कोकण मगदूमअली माहिमी उड्डाणपूल’ (जे.जे. फ्लायओव्हर) हा सुमारे २.५ किलोमीटर लांबी असणारा दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा उड्डाणपूल आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ ते जे. जे. रुग्णालय यांच्या दरम्यानाची वाहतूक सुलभ करणारा हा पूल ‘मोहम्मद अली मार्गा’वरुन जातो. याच पुलाच्या खालील ३ खांबांवर ‘व्हर्टीकल गार्डन’ प्रकारातील बगीचे साकारण्यात येणार आहेत.

या बगींच्यांसोबतच आकर्षण दिव्यांची रोषणाई देखील याठिकाणी असणार आहे.तर ‘इ’ विभाग – भायखळा येथील ‘खडा पारशी’ पुतळ्यालगत व अग्निशमन दलाच्या मुख्यालयाजवळ असणा-या ‘वाय ब्रिज’ (खडा पारशी उड्डाणपूल) च्या ४ खांबांवर ‘उभे उद्यान’ साकारले जाणार आहे. या ‘व्हर्टीकल’ उद्यानाच्या सभोवताली विद्युत दिव्यांची आकर्षक मांडणी साधून रोषणाई केली जाणार आहेत आणि ‘जी उत्तर’ विभाग – सदैव गजबजलेल्या दादर स्टेशनच्या पश्चिमेला बाहेर पडल्यावर कवि केशवसुत उड्डाणपुल दिसतो. याच उड्डाणपुलाच्या खालील १२ खांबांवर ‘उभी उद्याने’ साकारली जाणार आहेत. या उद्यानांच्या सभोवताली विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई व सुरक्षेच्या दृष्टीने कुंपणही केले जाणार आहे.या ६ उड्डाणपुलांखालील ३ उद्याने व ३ उभी उद्याने साकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सर्व उद्यानांसाठी पाणी व इतर आवश्यक परिरक्षण व्यवस्थेसाठी देखील तरतूद प्रस्तावित करण्यात आली असून विद्युत दिव्यांची रोषणाई करताना तुलनेने कमी वीज लागणारे एल.ई.डी. प्रकारातील दिवे प्राधान्याने बसविण्यात येणार आहेत. या उद्यांनांच्या उभारणीसाठी रुपये ४ कोटी ९६ लाख एवढा खर्च अंदाजित आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि पालिका स्थायी समितीच्या मंजूरीनंतर कार्यादेश देण्यात येतील. कार्यादेश दिल्यापासून ३ ते ४ महिन्यात संबंधित काम पूर्ण होणे अपेक्षित असेल, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडमुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

News Desk

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Aprna

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही आरोपींच्या जामीनाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब

News Desk