Site icon HW News Marathi

काळा घोडा कला महोत्सवाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट

मुंबई  । मुंबईतील कला प्रेमींसाठी संगीत नाट्य आणि कलेची मेजवानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळा घोडा कला (Kala Ghoda Arts Festival) महोत्सवाला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या महोत्सवाला शालेय शिक्षण तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भेट दिली. यावेळी काळा घोडा आर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

या महोत्सवात नृत्य, संगीत, व्हिज्युअल आर्ट्स थिएटर, साहित्य, खाद्य, बालसाहित्य आणि कार्यशाळा, सिनेमा, हेरिटेज वॉक, स्टँड अप कॉमेडी, स्ट्रीट आर्ट, शहरी डिझाईन आणि आर्किटेक्चर, व्हिज्युअल आर्टस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

काळा घोडा आर्ट असोसिएशनतर्फे आयोजित होणारा काळा घोडा कला महोत्सव फोर्ट आणि चर्चगेट परिसरातील रॅम्पर्ट रोड, क्रॉस मैदान, कूपरेज बँडस्टँड , म्युझियम गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या वर्षी पुन्हा एकदा कलाप्रेमींसाठी ही पर्वणी उपलब्ध होत आहे. हा महोत्सव 12 फेब्रुवारीपर्यंत कला रसिकांसाठी खुला राहणार आहे.

सन 1999 मध्ये स्थापित झालेल्या या वार्षिक कलामहोत्सवाने देशातील तसेच जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरात सुरु असलेल्या या कलामहोत्सवात ललित कला, नृत्य, नाटक – सिनेमा, वास्तुकला, छायाचित्रण, सांस्कृतिक आणि प्रादेशिक कला अशा अनेक कलांचे सादरीकरण होणार आहे.

पालकमंत्री केसरकर यांनी या महोत्सवाची पाहणी करुन आढावा घेतला आणि आवश्यक त्या सोयी सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना करुन  कलाकारांचे अभिनंदन केले. तसेच कलाप्रेमींना या कार्यक्रमात सहभागी होऊन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

Exit mobile version