Site icon HW News Marathi

ठाणे, पालघर जिल्ह्यांतील बुलेट ट्रेन प्रकल्प भू संपादन प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी! – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई। “ठाणे, पालघर जिल्ह्यांतील जमिनी प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी (bullet train project) संपादित करण्यात येत आहेत. या भूसंपादनात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल”, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधानपरिषदेत सांगितले.

ठाणे व पालघर जिल्ह्यांत समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन मार्ग, मुंबई-बडोदा महामार्ग अशा अनेक विकास प्रकल्पांचे काम सुरु आहे. या प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना उपविभागीय कार्यालय, भिवंडी या कार्यालयाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

भिवंडी तालुक्यातील जमीन मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणी भिवंडीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा यावेळी महसूल मंत्री विखे पाटील यांनी केली.

तसेच अंजूरगाव येथील शेतकरी उंदऱ्या दोडे यांच्या मृत्यूची विभागीय आयुक्तमार्फत चौकशी करण्यात येईल. या चौकशीमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूस संबंधित अधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भूसंपादनामध्ये ज्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही त्यांना लाभ देण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

शेतकरी दोडे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना आकस्मिक मदत करण्याचे तसेच त्यांच्या जमिनीचा मोबदला संबंधितांना मिळेल, या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

Exit mobile version