HW News Marathi
मुंबई

हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून सर्वाधिक मृत्यू

मुंबई | मुंबईची उपनगरीय लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफ लाइन आहे. दररोज ८० लाखापेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वेतून प्रवास करतात. मुंबईच्या रेल्वेमध्ये कायम गर्दी असते. ज्यामुळे प्रवाशांना स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दारावर लटकून आणि उभे राहून प्रवास करावा लागतो. तसेच काही प्रवासी ट्रेनच्या छतावर प्रवास करतात आणि काही तरुण मुले कसरत करतात. यामुळे दररोज सरासरी १० ते १२ प्रवासी रेल्वेतून पडून किंवा ओव्हरहेड वायरचा शॉक लागून मृत्युमुखी पडतात. तसेच गेल्या पाच वर्षांत शॉक लागून १४३ प्रवाशांनी आपला जीव गमावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना रेल्वे पोलीस विभागाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागून किती प्रवाशांचा मृत्यू किंवा जखमी झाले, याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात जनमाहिती अधिकारी वसंतराव शेटे यांनी शकील अहमद शेख यांना ‘माहिती अधिकार अधिनियम २००५’ अन्वये माहिती दिलेली आहे. या माहितीप्रमाणे सन २०१३ पासून मे २०१८ पर्यंत ओव्हरहेड वायरचा शॉक लागून एकूण १४३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण १३८ प्रवासी जखमी झाले आहेत.

मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कर्जत स्थानकांदरम्यान एकूण ६७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ५२ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते पालघर स्थानकांदरम्यान एकूण ४० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे आणि एकूण ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच हार्बर रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड ते पनवेल स्थानकांदरम्यान एकूण ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे आणि एकूण ३९ प्रवासी जखमी झाले आहेत. चेंबूर आणि टिळक नगर स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरचा शॉक लागून सर्वात जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. चेंबूर स्थानकावर एकूण ११ प्रवाशांचा मृत्यू व ६ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच टिळक नगर स्थानकावर एकूण ५ प्रवाशांचा मृत्यू व १४ प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये २०१७ साली रेल्वे गाड्यातून पडून झाल्याने ३०१४ प्रवासी मृत्यू पावले. रेल्वेतून पडून ३३४५ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच मध्य रेल्वेतून पडून झाल्याने १५३४ प्रवासी मृत्यू पावले आहेत तर रेल्वेतून पडून १४३५ प्रवासी जखमी झाले आहे. पश्चिम रेल्वेतून पडून झाल्याने १०८६ प्रवासी मृत्यू पावले आणि १५४० प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच हार्बर उपनगरीय रेल्वेतून पडून ३९४ प्रवाशांचा मृत्यू आणि रेल्वे गाडीतून पडून ३७० प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वेतून पडून जखमी किंवा मृत प्रवाशांना उपचारासाठी नेण्यासाठी कोणतेही विशेष कर्मचारी नियुक्त केले गेले नाहीत. त्यामुळे अपघातानंतर संबंधित स्टेशन मास्टर, स्थानिक हमाल व स्वयंसेवी सेवकांची मदत घ्यावी लागते.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते, हार्बर लाईनवर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून सर्वात जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याचे मुख्य कारण, हार्बर लाईनवर ट्रेनच्या फेऱ्या कमी आहेत. तसेच दुसरे कारण, गोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणारी तरुण मुले ट्रेनच्या छतावर स्टंटबाजी करताना आपले जीव गमावतात. गोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी आपापल्या मुलांना ताकीद देण्याची गरज आहे कि, ट्रेनच्या छतावर प्रवास करू नये आणि स्टंट करू नये. तसेच शकील अहमद शेख यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे कि, आपण सुरक्षित प्रवास करावा, आपल्या मागे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी करावी. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेअरमन अश्विनी लोहानी यांना पत्र पाठवून हार्बर लाईनवरील गाड्याच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांना अनोखी भेट

News Desk

मुंबईत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला

News Desk

मी आमदारांनी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर

News Desk