Site icon HW News Marathi

‘मविआ’च्या महामोर्चात ठाण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार

मुंबई | महापुरुषांचा वारंवार केला जाणारा अवमान, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी, राज्यातील बेरोजगारी या निषेधार्थ महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) येत्या 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या महामोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी दिली.

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले अनेक उद्योग परराज्यात विशेषतः गुजरातला नेले जात आहेत. ज्या उद्योगांमुळे महाराष्ट्रातील तरूणांना रोजगार मिळणार होता, असे उद्योग परराज्यात जात असतानाही सरकार ढिम्म आहे. तसेच, राज्यपालांसह सरकारमधील अनेक जबाबदार मंत्री महापुरुषांचा अवमान करीत आहेत. हा अवमान महाराष्ट्र या पुढे सहन करणार नाही, हा संदेश देण्यासाठीच हा महा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, असे परांजपे म्हणाले.

17 तारखेचा हा मोर्चा केवळ राजकीय पक्षाचा नसून महाराष्ट्र प्रेमीनी महाराष्ट्रद्रोहींविरोधात केलेला एल्गार आहे. या मोर्चासाठी ठाण्यातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत, असेही आनंद परांजपे यांनी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या या मोर्चाची भायखळा येथील रिचर्डस एण्ड क्रूडास येथून सुरूवात होणार असून बृहन्मुंबई महानगर पालिकेसमोर मोर्चाचा समारोप होणार आहे.

Exit mobile version