Site icon HW News Marathi

कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी दर २ महिन्यांनी संस्थांचा जनता दरबार! – मंगलप्रभात लोढा

मुंबई। कोकण विभागातील कौशल्य प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थांसमवेत (VTPs/TPs/TCs) बुधवारी (८ फेब्रुवारी) राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा Mangal Prabhat Lodha) यांनी संवाद साधला. कौशल्य विकास विभागामार्फत नोंदणीकृत असलेल्या या प्रशिक्षण संस्था आणि विभागामध्ये समन्वय साधणे, अडीअडचणी दूर करणे यासाठी यापुढील काळात दर २ महिन्यांनी या संस्थांचा जनता दरबार घेण्यात येईल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. तसेच संस्थांना येणाऱ्या अडीअडचणी थेट मंत्री कार्यालयस्तरावर सोडविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही यावेळी जाहीर करण्यात आला. राज्यातील गरजू तरुणांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मंत्री लोढा यांनी यावेळी केले.

एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे झालेल्या या बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, एनएसडीसीच्या अधिकारी श्रीमती शताब्दी यांच्यासह महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अधिकारी, कोकण विभागातील विविध कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कौशल्य प्रशिक्षणाच्या विविध कार्यक्रमांना गती देणे, अडीअडचणी सोडविणे याअनुषंगाने मंत्री लोढा हे राज्यभरातील प्रशिक्षण संस्थांबरोबर संवाद साधणार आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी कोकण विभागातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न, अडीअडचणी मंत्री लोढा यांनी ऐकून घेऊन त्या दूर होण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी काही संस्थाचालकांनी आपली मते मांडली. दर दोन महिन्यांनी याबाबतची बैठक संबंधितांसोबत घेण्यात येईल, असे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

मुंबई विभागातील १७० प्रशिक्षण संस्था चालक या बैठकीकरिता उपस्थित होते. बैठकीमध्ये कोकण विभागातील उत्तम काम करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान १ प्रशिक्षण संस्थांची निवड करून त्यांचा मंत्री लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयडीईएमआय (मुंबई शहर), टीसी – के. जी. सोमय्या पॉलिटेक्निक, (मुंबई उपनगर), शगुन समाज विकास संस्था (जि. ठाणे), ऋषी कॉम्प्युटर एज्युकेशन (जि. पालघर), ब्युटीफुल टुमॉरो (जि. रायगड), सेंटर फॉर क्रिएटीव्हीटी डेव्हलपमेंट सेवा सामाजिक विकास संस्था, (जि. रत्नागिरी), श्री साई इन्फोटेक कॉम्प्युटर (सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) या संस्थांना सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version