Site icon HW News Marathi

राज ठाकरेंच्या ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | दरवर्षी दिवाळी निमित्ताने मनसेच्या वतीने दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या  ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ शुभारंभ आज (21 ऑक्टोबर) होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे तिन्ही पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

सत्तांतरानंतर राज्यात राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आले. यात फडणवीस उपमुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले होते. यानंतर गणेशोत्सवानिमित्ताने ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते. यानंतर राज ठाकरेंनी देखील मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. याआधी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीमुळे नवे समीकरण जुळाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज दीपोत्सवानिमित्ताने हे तीन नेते एकत्र येणार आहे.

 

राज ठाकरेंनी ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’निमित्ताने ट्वीट करत दीपोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी पत्र लिहिले आहे. “यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे”, राज ठाकरेंनी ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’निमित्ताने ट्वीट करत शिवाजीपार्कवरील आपल्या दीपोत्सवाला तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा”, असे ट्वीट केले.

 

राज ठाकरेंनी पत्रात म्हटले

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
राज ठाकरे

दि. २१ ऑक्टोबर २०२२

माझ्या शिवाजीपार्क शेजाऱ्यांनो
तसंच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो,

सस्नेह जय महाराष्ट्र!

दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष कोरोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय.

दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच ‘दीपोत्सव’ हे गेल्या १० वर्षापासून जणू समीकरणच बनलं आहे. दरवर्षी
आपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या २ वर्षांत सुध्दा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला
नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी
हे पत्र लिहितो आहे.

दीपावलीच्या निमित्ताने आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो. दादर मधील हा शिवतीर्थाचा परिसर, हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला तर महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा होईल. हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे.

वसुबारसेपासून, २१ ऑक्टोबर २०२२ पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत, ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत, हा दीपोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी वसुबारसेला म्हणजे २१ ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन या. मित्र मंडळींना सांगा. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा.

आपल्या सर्वाचा,
राज ठाकरे

Exit mobile version