HW News Marathi
मुंबई

ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे | ठाणे महापालिकेने केलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. हा ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे.  ठाणे (Thane) बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी (४ मार्च) वागळे इस्टेटमधील लोकार्पण सोहळ्यात काढले. मुंबईप्रमाणेच ठाणेदेखील आंतराष्ट्रीय शहर करण्यासाठी राज्य शासनाकडून लागेल ती मदत देण्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, परिवहन सभापती विलास जोशी, आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवडे, माजी नगरसेवक आणि नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा ज्या गावदेवी मैदानात झाली, ते मैदान सुरक्षित ठेवून तेथे चांगली पार्किंग सुविधा तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर, कळवा रुग्णालयातील सुविधांचा ठाणेकरांना फायदा होईल. इलेक्ट्रिक बसेस या ठाणे प्रदूषणमुक्त करण्याची पहिली पायरी आहेत. वागळे इस्टेटमधली वाहतूक बेट तर सेल्फी पॉइंट झाले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ठाण्याच्या इतिहासात राज्य शासनाने प्रथमच एवढा निधी ठाणे महापालिकेस दिला आहे. त्याचा व्यवस्थित विनियोग केला जावा. लोकांचा पैसा लोकांसाठीच्या सुविधांसाठी खर्च झाला पाहिजे. त्या सुविधा गुणवत्तापूर्ण असाव्यात. रस्ते, प्रकल्प यात दर्जा राखला जात नसेल तर कोणतीही तमा न बाळगता कारवाई करा, असे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. त्याचवेळी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत त्याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले.

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानांतर्गत खड्डेमुक्त ठाणे, कचरा कुंड्यांपासून मुक्ती, शौचालय सुधारणा आणि सौंदर्यीकरण ही कामे सुरू झाली आहेत. ३१ मेपर्यंत ठाणे शहरात आणखी बदल दिसतील आणि ठाणेकरांना सुखद अनुभव मिळेल, अशी ग्वाही आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविकपर भाषणात दिली.

वाचनालयाचे कौतुक

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ‘लेट्स रिड इंडिया फाऊंडेशन’ यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या वाचनालयाचे मुख्यमंत्री  शिंदे यांनी कौतुक केले. ही अतिशय चांगली कल्पना आहे. या वाचनालयाची रचना, त्याची मांडणी आणि त्यातील पुस्तके ही सगळी कल्पना नाविन्यपूर्ण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. वाचन संस्कृती वाढवणारा हा उपक्रम पाहून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री  शिंदे यांनी नोंदवली. वाचनालयाच्या या उपक्रमाचा विस्तार करण्याचा महापालिकेचा मनोदय असल्याचे आयुक्त  बांगर यांनी सांगितले.

…थेट नवीन घरात!

ठाण्यातील धोकादायक इमारती हा आपल्या चिंतेचा विषय आहे. म्हणून त्यावर राज्य सरकारने क्लस्टरची योजना आणली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्यांनी संक्रमण शिबिरांची भीती बाळगू नये. मोकळ्या जागांवर इमारती बांधून नागरिकांना थेट नवीन घर देण्याचा प्रयत्न आहे. त्याबद्दल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, या कामांतील बहुतेक सगळे अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे तातडीने कामाला सुरूवात करुया, अशा सूचना आयुक्त  बांगर यांना दिल्या.

नवीन रेल्वे स्थानकाचा लाभ ठाणेकरांना

ठाणे ते मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जमीन मिळण्यातील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे नवीन स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्थानकामुळे मूळ ठाणे स्थानकावरील ताण कमी होईल आणि लाखो ठाणेकरांना त्याचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कंटेनरमधील शौचालये हायवेवरही!

वागळे इस्टेटमध्ये तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या कंटनेरमधील शौचालय या संकल्पनेचे मुख्यमंत्री महोदयांनी कौतुक केले. अशा प्रकारची शौचालये हायवेलगत उभारून नागरिकांची गैरसोय टाळता येईल, अशी सूचनाही  त्यांनी केली. नागरिकांनीही शहरातील स्वच्छतेसाठी जबाबदारीने वागावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकार्पण आणि भूमिपूजन

कोपरी खाडी किनारा विकास प्रकल्प, गावदेवी भूमिगत वाहनतळ, कळवा खाडी किनारा विकास प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या सुसज्ज अशा प्रसूतिगृहाचे व वाचनालयाचे उद्घाटन, तसेच ब्लड डोनेशन व्हॅन, नातेवाईकांसाठी रात्र निवारा, अक्षयचैतन्य संस्थेतर्फे रुग्णांसाठीच्या मोफत भोजन कक्षाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याशिवाय, वागळे इस्टेट येथील रोड नं. २२ च्या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण, ३९१ कोटींच्या रस्ता मजबूतीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन,  परिवहन सेवेत दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोरेगावत दोन गोदामांना भीषण आग ,15 जणांना बाहेर काढले

swarit

राष्ट्रपतींचा उपयोग शून्य – राज ठाकरेंचं वादग्रस्त वक्तव्यं

News Desk

मेट्रोचा खांब बेस्टवर कोसळला

swarit