Site icon HW News Marathi

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक मतदानाला सुरुवात; जाणून घ्या… ‘या’ मतदारसंघ किती मतदार, मतदान केंद्र

मुंबई । महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६-अंधेरी पूर्व’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly by-election) आज (३ नोव्हेंबर) मतदानाला सुरुवात झाली आहे. हे मतदान आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधी दरम्यान होणारी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास प्रशासन सज्ज असून याकरिता आवश्यक ती सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. तसेच या अनुषंगाने अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदार केंद्रावर वेळेत पोहचून आपला मतदानाचा पवित्र हक्क आवर्जून बजवावा आणि नागरिक म्हणून आपले लोकशाही कर्तव्य ज़रुर पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  निधी चौधरी यांनी केले आहे.
अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा भाग म्हणून गुरुवारी होणाऱ्या मतदानासंदर्भात मुंबई उपनगरच्या वांद्रे पूर्व  जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत  निधी चौधरी बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  अजित साखरे हे उपस्थित होते. आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आलेल्या माहितीचा मुद्देनिहाय संक्षिप्त तपशील पुढील प्रमाणे आहे.  १६६ अंधेरी पूर्व या मतदार संघाची पोटनिवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया ही गुरुवार, दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत होणार आहे.
 मतदार संख्या तपशील :
एकूण मतदार : २ लाख ७१ हजार ५०२
२५६ मतदान केंद्रांपैकी २३९ मतदान केंद्रे ही तळ मजल्यावर असून उर्वरीत १७ मतदान केंद्रे ही पहिल्या मजल्यावर आहे. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी उद्वाहन अर्थात लिफ्ट ची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सर्व ठिकाणी व्हिल चेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
या पोटनिवडणूकीसाठी ०७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये खालील उमेदवाराचा समावेश आहे.
१.  ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२.  बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
३.  मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४.  नीना खेडेकर (अपक्ष)
५.  फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६.  मिलिंद कांबळे (अपक्ष)
७.  राजेश त्रिपाठी (अपक्ष)
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मतदान केंद्रांच्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅन्डग्लोव्हज, मास्क, पी.पी.ई. कीट, थर्मामिटर गन आणि कोविड विषयक मार्गदर्शन फलक इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.
Exit mobile version