HW News Marathi
देश / विदेश

ऊँ च्या प्रतिमेने बनवला जागतिक विक्रम

– ९७८ शालेय विद्यार्थ्यांनी बनवली ऊँ ची प्रतिमा
– ऊर्जा वर्ल्ड फाऊंडेशनने घडविला इतिहास
– एनर्जी गुरू अरिहंत महाराजांच्या मार्गदर्शनाखाली झाला विश्वविक्रम
अजय कल्याणे
ठाणे – तब्बल ९७८ शालेय विद्यार्थ्यांनी मिळून ऊँ या अक्षराची प्रतिमा तयार करून आज (रविवार दि. ८ जानेवारी) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. ऊर्जा वर्ल्ड फाऊंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महानामा राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री कुशाग्रानंदजी गुरूवर्य यांच्या आशिर्वादाने आणि एनर्जी गुरू अरिहंत महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऊर्जा फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘ऊर्जा वर्ल्ड फेस्टिवल’मध्ये हा विश्वविक्रम नोंदविण्यात आला आहे. ठाण्यातील हायलँड गार्डनच्या मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा विश्वविक्रम नोंदविण्यात आला.
सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी विश्वविक्रमाला सुरूवात झाली आणि ५ वाजून २३ मिनिटांनी हा विश्वविक्रम पूर्ण झाला. यावेळी ९७८ विद्यार्थ्यांनी (मुलं – मुली) ऊँ या अक्षराची प्रतिमा तयार केली. यावेळी शेवटच्या मिनिटापर्यंत उपस्थितांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर एनर्जी गुरू अरिहंत महाराज यांनी शेवटच्या मिनिटांचे काऊंटडाऊन मोजायला सुरूवात केली आणि एक मिनिट पूर्ण झाल्यानंतर गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी हा विश्वविक्रम झाल्याचे घोषित करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात हा क्षण साजरा केला.
यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहताही उपस्थित होते. विज्ञानाची ऊर्जा थांबल्यानंतर तिथून पुढे धर्माची ऊर्जा सुरू होते, असे सांगत मेहता यांनी अध्यात्माविषयीची महती सांगितली. भारताने जगाला आयुर्वेद, होमोओपॅथी यासारख्या अत्यंत मूल्यवान गोष्टी दिल्या आहेत. त्याचा वापर आज संपूर्ण जगात सुरू आहे. ध्यान, योग यासारख्या अमूल्य गोष्टी भारताने जगाला दिल्या आहेत. भारत आपल्या क्षमतांवर सुपर पॉवर होण्याच्या दृष्टीने पुढे सरसावल्याचे मेहता यांनी सांगितले.
ऊँ शिवाय कुठलाही मंत्र पूर्ण होत नाही, त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये ऊँ चे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे एनर्जी गुरू अरिहंत महाराज यांनी सांगितले.
यावेळी ठाणे ग्रामीणचे खासदार कपिल पाटील, भाजपचे आमदार संजय केळकर, नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईरही उपस्थित होते. हास्यकलाकार सुनील पाल, हास्य अभिनेते श्री. महाशब्दे (अय्यर, तारक मेहता का ऊल्टा चष्मा फेम) यांच्यासोबतच विविध सांस्कृतिक मंडळांनी पारंपारिक नृत्य, एकांकिकांचे सादरीकरण केले.
चौकट – ऊर्जा वर्ल्ड सेंटरचे उद्घाटन
पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, रंग, ध्वनी अशा विविध प्रकाराने उपचार करण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने उपचार करणारे हे जगातील पहिलेच केंद्र असणार आहे. या केंद्राचे उद्घाटन एनर्जी गुरू अरिहंत महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे ५० एकर परिसरात ऊर्जा वर्ल्ड सेंटर उभारण्यात येत आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. संतोष आंब्रे आणि प्रेम इंगळे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची बाजू सांभाळली. तर रूपेश मिरकर, गणेश तळेकर आणि श्रद्धा शेलार यांनी मुख्य कार्यक्रमाचे नियोजन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मांडता आले नाहीच

News Desk

#Article370Abolished : सरकारचा ‘हा’ निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्याविरोधात !

News Desk

सेन्सेंक्स एक हजार अंकांनी कोसळला

swarit