Site icon HW News Marathi

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार! – सुधीर मुनगंटीवार

अहमदाबाद । गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियाटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली. गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा व सुधीर मुनगंटीवार यांच्यात काल (26 सप्टेंबर) अहमदाबाद येथे यासंदर्भात चर्चा झाली.

प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीकडून प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव)  सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. 4 एप्रिल 2022 रोजी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली चे संचालक जी मल्लिकार्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली व कार्यवाही सुरू केली होती.

त्यावर सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री  विश्वकर्मा यांनी सोमवारी 26 सप्टेंबर ला विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले.

Exit mobile version