Site icon HW News Marathi

मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर सर्वोच्च न्यायालयात आज प्रत्यक्ष सुनावणी होणार

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर आज (१५ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या अंतरिम आदेशावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ७ जुलैला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करण्यात आली होती मात्र प्रत्यक्ष सुनावणी करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आज प्रत्यक्ष न्यायालयात सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरुवात होईल. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती एल. एन. राव यांच्या अध्यक्षतेखालील ३ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल.

राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण वैध ठरवण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायलयात ही याचिका लढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून तज्ज्ञ वकिलांची टीम तयार करण्यात येत आहे. देशाचे दिग्गज वकील कपिल सिब्बल यांची मराठा आरक्षणाचा खटला लढवण्यासाठी राज्य सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने हा खटला लढवण्यासाठी मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांची नियुक्ती यापूर्वी केलेली होती. त्यासोबतच आता कपिल सिब्बल आणि ज्येष्ठ वकील रफीक दादा हे दिग्गज मराठा आरक्षणाचा खटला लढवणार आहेत.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात ७ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली होती. सुनावणीत याचिकाकर्त्यांनी आपली बाजू ठोसपणे मांडली होती. मात्र, यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकूनच निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मराठा आरक्षणावर खुल्या न्यायालयात सुनावणी घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली होती. राज्य सरकारचे अधिवक्ते मुकुल रोहतगी यांनी मराठा आरक्षणाचे सर्व मुद्दे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मांडता येत नसल्याचा युक्तिवाद केला होता.

Exit mobile version