Site icon HW News Marathi

‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ

नवी दिल्ली | दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या  हस्ते करण्यात आला. येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात आज (7 ऑगस्ट) सकाळी राज्यपाल  कोश्यारी यांच्या हस्ते ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार हरिभाऊ राठोड, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सचिव तथा आयुक्त (गुंतवणूक  व राजशिष्टाचार) निवासी आयुक्त (अ. का.) डॉ.निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश आडपवार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा, यांच्यासह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र सदन येथे निवासी असलेले अभ्यागत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी ध्वज उंचावून ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाचा रितसर शुभारंभ करुन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित मुख्य सचिव श्रीवास्तव, श्रीमती पांडे यांच्यासह उपस्थितांनीही ध्वज उंचावून ‘वंदे मातरम्’ , ‘भारत माता की जय’ या घोषणा दिल्या. या घोषणांनी महाराष्ट्र सदन  निनादले.

दिल्लीत मराठी भाषिक लोकांची जवळपास अडीच लाख लोकसंख्या असून, हे लोक दिल्ली व परिसर क्षेत्रात वास्तव्यास आहेत. या सर्वांची नाळ महाराष्ट्राशी जुळलेली असून  राज्यात साजरे केले जाणारे सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम येथेही सार्वजनिकरित्या साजरे केले जातात.  महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित कार्यालयांच्या समन्वयातून यांना एकत्रित करुन अनेकदा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.  ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) या अभिनव उपक्रमाअंतर्गत दिल्ली  स्थित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी भाषिक मान्यवरांच्या हस्ते ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे महत्व पटवून, या अभियानाचा प्रचार-प्रसार महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे.

Exit mobile version