Site icon HW News Marathi

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला अन् इकडे भाजपचे सेलिब्रेशन सुरू

मुंबई |  गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेलं राज्यातील सत्तासंघर्षाचं नाट्य आता अखेर संपुष्टात आलं आहे. एकनाथ शिंदे गटाने पक्षाविरोधात केलल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. याचाच फायदा घेत भाजपने राज्यपालांकडे धाव घेत बहुमत चाचणीची मागणी केली. यानंतर बुधवारी सकाळीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं. मात्र ही चाचणी होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे केवळ महाविकास आघाडीच नाही तर राज्यातील जनतेलाही हा धक्का बसला आहे.
खरंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन अडीच वर्षं झाली असताना आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अखेर कोसळलंय. पण, हे सरकार आज पडेल, उद्या पडेल असा दावा सातत्याने करणारे भाजपचे नेते मात्र ठाकरेंनी राजीनामा देताच सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अखेर भाजपची इच्छा पूर्ण झाली असल्याचं म्हंटलं जात आहे. तर यावेळी भाजपचे अनेक नेते एकत्र आले असून त्यांनी या क्षणाचा जल्लोष केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवून एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागतच केलंय. तर भाजपचा हा आनंद पाहता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य आणि त्यासंबंधित पोस्ट व्हायरल होऊ लागले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याआधी राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामकरणास मान्यता देण्यात आली, तर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावासही मंजूर करण्यात आला. तसेच उस्मानाबादचं नाव ‘धाराशिव’ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर दुसरीकडे उद्या बहुमत चाचणी म्हणजेच फ्लोअर टेस्ट होणारच आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला धक्का देत बहुमत चाचणी उद्याच घेण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करत जनतेला संबोधित केलं. तसेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी यावेळी केली. “शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच “उद्यापासून मी पुन्हा शिवसेना भवनात बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार आहे”, असं सांगत त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.
संबंधित बातम्या
मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय! – उद्धव ठाकरे
Exit mobile version