Site icon HW News Marathi

जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंगाच्या आरोपावर अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका, म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या प्रकरणात कोणताही विनयभंगाचा प्रकार नसताना त्यात गुन्हा दाखल करून एखाद्या लोकप्रतिनिधीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांवर केला. जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या खोट्या आरोपात नाहक अडकवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचला जातोय. या प्रकरणी अजित पवार  यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आपण एखादा कायदा कोणावर अन्याय होऊ नये. यासाठी तयार करतो, पण कायद्याचा आधार घेऊन निष्पाप व्यक्तीवर अन्याय होणं बरोबर नाही, असे स्पष्ट मत अजित पवारांनी व्यक्त केले. हे एक प्रकारचे षड्यंत्र असून या प्रकरणात जसा वेळ जाईल त्याप्रमाणे यामागील सूत्रधार नेमका कोण याचा खुलासा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असे षड्यंत्र रचून वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असेल तर यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे, अशी आग्रही मागणी अजित पवार केली.
पुढे अजितदादा म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागील अनेक काळ सत्तेत असताना गृह खात हे राष्ट्रवादीकडे होते मात्र त्या काळात या खात्याचा गैरवापर होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली. त्यावेळी या खात्याचा आदरयुक्त दरारा होता. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणात कोणताही विनयभंगाचा प्रकार नसताना त्यात गुन्हा दाखल करून एखाद्या लोकप्रतिनिधीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
आमदार म्हणून निवडून येताना पाच लाख लोकांचे प्रतीनिधित्व केले जाते. या काळात लोकांशी संपर्क ठेवणे, सर्वांना बरोबर घेऊन चालणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र आज या परंपरेला तिलांजली देण्याचे काम सुरू आहे ते अतिशय घातक आहे, असे अजित पवार म्हणाले. लोकांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता एकजूटीने या गोष्टीला सामोरे जाऊ, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीच्या राजिनाम्या संदर्भात घेतलेली भूमिका मागे घ्यावी आणि जिथे अन्याय होतो तिथे वाचा फोडण्याचे काम एकत्र मिळून करूया, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
Exit mobile version