Site icon HW News Marathi

“अजूनही वेळ गेलेली नाही, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू,” उद्धव ठाकरेंचे बंडखोरांना भावनिक आवाहन

मुंबई | “शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझ्या समोर या बसून चर्चा करू,” असे भावनिक आवाहन राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि शिवसैनिकांना पत्राद्वारे केले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 30 आमदारांसह पक्षासोबत बंडखोरी केली आहे. हे सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहेत. “शिवसेनाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला आजही तुमची काळजी वाटते, मी तुम्हाला  मनापासून सांगतो की, अजूनही वेळ गेलेली नाही,” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.

उद्धव ठाकरे पत्रातून म्हणाले, “काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू.”

उद्धव ठाकरे पत्रात काय म्हणाले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो
जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात . आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात . आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत , आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे

संबंधित बातम्या
“कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, नावे जाहीर करा,” एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला ओपन चॅलेंज
Exit mobile version