HW News Marathi
राजकारण

विरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही !

मुंबई | लालकृष्ण आडवाणी यांनी मौन मोडले आहे. आडवाणी हे पुन्हा बोलते झाले ही आनंदाची बाब आहे.पूर्वीच्या काळी मोठे राजकारणी व नेते एकमेकांना पत्रे लिहून आपल्या भावना, एखाद्या विषयावरील मत व्यक्त करीत होते व त्यावर मंथन (आता चिंतन) होत असे. ‘डिजिटल इंडिया’मुळे पत्राची जागा ‘ब्लॉग’ने घेतली. विरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही. ज्यांचे आपल्याशी राजकीय मतभेद आहेत त्यांना आपल्या पक्षाने कधीही देशविरोधी किंवा शत्रू मानलं नाही, तर केवळ प्रतिस्पर्धी मानले. इंदिरा गांधी यांच्या बाबतीतही 1975 नंतर वेगळे घडत नव्हते. ‘इंदिरा इज इंडिया’ अशा घोषणा व गर्जना तेव्हा झाल्या व त्या गर्जना करणार्‍यांची पुढची पिढी ‘मोदी इज नॉट इंडिया’ असा प्रतिवाद करीत आहे. ‘इंदिरा इज इंडिया’ हा विचार लोकांच्या पचनी पडला नव्हता. ही आपल्या लोकशाहीची खुबसुरती आहे व आडवाणी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये तीच भावना व्यक्त केली आहे, अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आडवाणी यांनी मौन सोडल्यानंतर आनंद व्यक्त करत त्यांच्या पत्रातून भाजपच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

सामनाचे आजचे संपादीकय

आडवाणी यांनी पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून त्यांची ‘मन की बात’ जोरकसपणे मांडली आहे. आडवाणी हे पुन्हा बोलते झाले ही आनंदाची बाब आहे. आता त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही. त्यांनी मौन सोडले आहे. भीष्मांचे मुक्त चिंतन कोणती वावटळ उठवते ते पाहायचे. आडवाणींच्या मुक्त चिंतनाचे स्वागत मोदी यांनी केले आहे. हवा बदलत असल्याचे हे संकेत आहेत.

अखेर लालकृष्ण आडवाणी यांनी मौन मोडले आहे. पण ते तोंडाने बोलले नसून लिखाणातून बोलले आहेत. पूर्वीच्या काळी मोठे राजकारणी व नेते एकमेकांना पत्रे लिहून आपल्या भावना, एखाद्या विषयावरील मत व्यक्त करीत होते व त्यावर मंथन (आता चिंतन) होत असे. ‘डिजिटल इंडिया’मुळे पत्राची जागा ‘ब्लॉग’ने घेतली. त्यामुळे आडवाणी यांनी व्यक्त होण्यासाठी ‘ब्लॉग’चा आधार घेतला. पण त्यासाठी त्यांनी तब्बल पाच वर्षे घेतली. आडवाणी यांनी म्हटले आहे की, विरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही. ज्यांचे आपल्याशी राजकीय मतभेद आहेत त्यांना आपल्या पक्षाने कधीही देशविरोधी किंवा शत्रू मानलं नाही, तर केवळ प्रतिस्पर्धी मानले. आडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठाने हे मत व्यक्त केल्यामुळे त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या एका प्रमुख संस्थापकाने हे बोलावे याचे प्रयोजन काय? आडवाणी यांनी पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून त्यांची ‘मन की बात’ जोरकसपणे मांडली आहे. विरोधक देशविरोधी कारवाया करीत आहेत व भाजपविरोधक खासकरून पाकिस्तानसारख्या शत्रूची भाषा बोलत असल्याच्या तोफा प्रचारात धडाडत आहेत. प्रचारात विकास, प्रगती, महागाई, बेरोजगारीसारखे मुद्दे मागे पडले व पाकिस्तान, राष्ट्रीय सुरक्षा यांना महत्त्व आले आहे. पुलवामातील चाळीस जवानांचे बलिदान व त्यानंतर हवाई दलाने बालाकोटच्या दहशतवादी केंद्रावर केलेल्या हल्ल्याने इतर विषय

मागे पडल्याचा भास

झाला. तो तात्पुरता होता. विरोधकांनी हवाई हल्ल्याचे पुरावे मागणे जसे चूक आहे तसे पुरावे मागणार्‍यांना देशविरोधी मानणे चूक आहे, असे आडवाणी यांच्या लिखाणातून दिसते. जे मोदींबरोबर नाहीत ते देशाबरोबर नाहीत हा भाजपच्या प्रचाराचा बिंदू आहे व विरोधकांना तो मान्य नाही. त्यांचे म्हणणे असे की, मोदी म्हणजे देश नाही. विरोधकांचे हे म्हणणे चुकीचे नसेलही, पण इंदिरा गांधी यांच्या बाबतीतही 1975 नंतर वेगळे घडत नव्हते. ‘इंदिरा इज इंडिया’ अशा घोषणा व गर्जना तेव्हा झाल्या व त्या गर्जना करणार्‍यांची पुढची पिढी ‘मोदी इज नॉट इंडिया’ असा प्रतिवाद करीत आहे. ‘इंदिरा इज इंडिया’ हा विचार लोकांच्या पचनी पडला नव्हता. ही आपल्या लोकशाहीची खुबसुरती आहे व आडवाणी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये तीच भावना व्यक्त केली आहे. आडवाणी यांनी सांगितले की, माझ्यासाठी आधी देश, नंतर पक्ष व सगळ्यात शेवटी मी. आडवाणी यांची पिढी हाच मंत्र घेऊन जगली व लढली. निवडणुका या लोकशाहीचा उत्सव आहेत. त्या योग्य पद्धतीने आणि निःपक्ष पद्धतीने झाल्या पाहिजेत, असे मत आडवाणी यांनी मांडले आहे ते नेमके कोणासाठी? देशातील भाजपविरोधकांनी असा धुरळा उडवला आहे की, मोदी पुन्हा जिंकले तर देशात एकाधिकारशाही, देश व्यक्तिकेंद्रित बनेल. मोदी भारतीय संविधानाचा गळा घोटतील. पुन्हा निवडणुका होणार नाहीत. असा धुरळा उडवणे हा विरोधकांचा कचखाऊपणा आहे. विरोधकांनी ठामपणे उभे राहावे व त्यांना जे पटत नाही त्यास विरोध करावा. पण

विरोधकांना एक नेता नाही

आणि एक विचार नाही. त्यामुळे त्यांच्यात एकवाक्यता नाही. त्यास मोदी किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी काय करणार? देशात सध्या जर काही चुकीचे घडत असल्याची कुणाची भावना असेल तर त्यास सत्ताधारी पक्ष जबाबदार नसून ढेपाळलेला विरोधी पक्ष सर्वाधिक जबाबदार आहे. 2014 साली मतदारांनी देशातील तत्कालीन सत्ताधार्‍यांनाच झिडकारले असे नाही, तर विरोधकांनाही झिडकारले. तरीही विरोधक त्यांना हवे ते बोलतात. हे देशात लोकशाही मरण पावल्याचे लक्षण नाही. आमची सत्ता आली तर चौकीदारास तुरुंगात टाकू, असे जाहीरपणे बोलणे व त्यानंतरही मुक्त फिरणे हे काही देशात व्यक्तिस्वातंत्र्य संपूर्ण संपल्याचे लक्षण नाही. मोदी हे संविधानाचा गळा घोटतील व पुन्हा निवडणुका होणार नाहीत असे जे म्हणतात ते देशातील जनतेचा अपमान करीत आहेत. संविधानाचा गळा घोटणे सोपे नाही व पुन्हा प्रकाश आंबेडकरांसारखे नेते संविधान बचाव आंदोलनासाठी उभे आहेतच. विरोधकांनी नैतिकता, धैर्य व एकवाक्यता दाखवली तर सत्ताधारी बेबंद वागणार नाहीत. आडवाणी यांनी त्यांची भूमिका मांडली, पण विरोधकांत आज आडवाणींसारखा भीष्माचार्यही नाही व मोदींसारखा कृष्णार्जुन नाही. ते विष्णू आहेत. पाच पांडवांचे बळही त्यांच्यात आहे. त्यामुळेच विरोधकांच्या रथाचे चाक चिखलात रुतले आहे. मात्र त्याचे खापर ते मोदींवर फोडत आहेत. आडवाणी हे पुन्हा बोलते झाले ही आनंदाची बाब आहे. आता त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही. त्यांनी मौन सोडले आहे. भीष्मांचे मुक्त चिंतन कोणती वावटळ उठवते ते पाहायचे. आडवाणींच्या मुक्त चिंतनाचे स्वागत मोदी यांनी केले आहे. हवा बदलत असल्याचे हे संकेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा बारामतीत भाजपचे कमळ फुलवू, मुख्यमंत्र्यांचा दावा

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सहमत नाही | रामदास आठवले

News Desk

RamMandir : उद्धव ठाकरे ‘लक्ष्मण किला’ येथे पोहोचले

News Desk