HW News Marathi
राजकारण

भाजप नेत्यांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण

मुंबई | स्वत:च्या संघटनेचा पूर्व इतिहास संपूर्णपणे काळा असल्याने आणि शासन चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने द्वेषग्रस्त व मानसिक घुसमटीत अडकलेले भाजप नेते इतिहासाच्या पानातून बेफामपणे महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग करित आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने महात्मा गांधी, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जीवनचरित्रांवर आधारीत पुस्तकांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय म्हणजे ‘विनोद’च आहे.अशी उपहासात्मक टीका करून चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व नेते आत्मस्तुतीत गुंग झाले आहेत.

नुकतेच खादी ग्रामोद्योग विभागाच्या कॅलेंडरवरून महात्मा गांधीजींचे छायाचित्र काढून व स्वतः चरखा चालवत असल्याचे छायाचित्र टाकणे. देशासाठी कोणतेही योगदान नसलेल्या दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या नेत्यांच्या जीवनचरित्रांवरील पुस्तकांवर कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करणे व देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणा-या महापुरुषांची नावे हटवून जनतेच्या मनात आदराचे स्थान नसलेल्या नेत्यांची नावे विविध योजनांना देणे असे अश्लाघ्य प्रयत्न या सरकारने वेळोवेळी केलेले आहेत.

इतिहासाची विटंबना करून थोर नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे आणि शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करून स्वहितासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणे असे घृणास्पद प्रकार भाजपच्या केंद्र व विविध राज्य सरकारांकडून सुरु आहेत. पंडीत जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात संघर्ष होता असे खोटे चित्र जाणिवपूर्वक उभे करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने महात्मा गांधी, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्यावरील खर्च कमी केला आहे.

नवीन पिढीमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर कमी व्हावा यासाठीचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. परंतु गांधी,फुले, आंबेडकर ही केवळ नावे नसून त्यांचे थोर विचार, देश व समाजाकरिता केलेला प्रचंड मोठा त्याग व महान कर्तृत्व त्याबरोबर जोडलेले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी घालून दिलेले आदर्श व त्यांच्या विचारांचा सुगंध कालातीत असून आताच्याच नव्हे तर येणा-या शेकडो पिढ्यांच्या ह्रदयातून ही नावे पुसणे अशक्य आहे. गांधीजींच्या विचारांचा विरोध करण्याची क्षमता नव्हती म्हणून गांधी हत्या करण्यात आली. पण त्यांच्या विचारांची हत्या करता आली नाही. गांधीजींचे विचार जगाने आत्मसात केले, म्हणूनच पुस्तकाच्या पानांमधून त्यांची नावे खोडण्याचा प्रयत्न करण्याच्या कृतीने भाजप नेत्यांना विकृत आनंद मिळेल परंतु ही नावे जनतेच्या ह्रदयातून कशी काढू शकाल? असा प्रश्न विचारून असे प्रयत्न जगाच्या व देशाच्या दृष्टीकोनातून हास्यास्पद व दयनीय ठरत आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये भाजप नेत्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

News Desk

#LokSabhaElections2019 : सुजय विखे पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार ?

News Desk

मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करायचे असतील तर पैसे मोजावे लागणार !

News Desk