HW News Marathi
राजकारण

मालिकांचा वापर करून छुपा प्रचार करण्याचे भाजपचे मायावी तंत्र, काँग्रेसचा आरोप

मुंबई | आचारसंहिता भंग आणि जाणीवपूर्वक प्रेक्षकांचा विश्वासघात करत असल्याप्रकरणी झी टीव्ही, अॅन्ड टीव्ही या वाहिन्यांचे प्रक्षेपण तात्काळ थांबवून भाभीजी घर पर है, तुझसे है राबता या मालिकांच्या निर्माते व कलाकारांसह भाजपविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडे केली आहे.

“निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भाजपकडून एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे वेळोवेळी आचारसंहितेचा भंग केला जात आहे. परंतु यावेळी अत्यंत गंभीर अशा पेड न्यूजच्या धर्तीवर मालिकांचा उपयोग सत्ताधारी पक्षाच्या योजनांचा व नेत्यांच्या प्रचार व प्रसार करण्याकरिता केला जात असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरु आहे. मालिकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून भाजपकडून छुप्या मार्गाने मायावी तंत्र वापरून प्रचार केला जात आहे. ही कार्यपद्धती समजून घेण्याकरिता झी टीव्हीवरील ‘तुझसे हे राबता’ व अॅन्ड टीव्हीवरील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमधील दृश्य पेन ड्राईव्हच्या माध्यमातून पुरावे म्हणून आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्ताकडे सोपवले आहेत”, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

सदर मालिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या अनेक योजनांची भलामण जाहिरातीप्रमाणे करण्यात आली आहे. याकरिता कुठेही जाहिरात म्हणून सूचना देण्यात आलेली नाही. लोकांची मानसिकता प्रभावित करून सत्ताधा-यांना लाभ मिळवून देण्याचा कुटील डाव यातून स्पष्टपणे समोर आला आहे. पेड न्यूज ही देखील याच प्रकारात मोडते. त्यामुळे पेड न्यूजच्या धर्तीवर या प्रकाराची नोंद घेऊन जनतेचा विश्वासघात तथा आचारसंहितेचे घोर उल्लंघन केल्याबद्दल या वाहिन्यांचे प्रक्षेपण तात्काळ बंद करून वाहिन्यांचे मालक, तसेच मालिकांचे निर्माते आणि कलाकारांसोबतच भारतीय जनता पक्षावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणात कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्याचीही चौकशी करून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा ही अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरन्यायाधीशांचे तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल

Aprna

आश्वासनांचे किती ‘फुगे’ फुटणार?, ठाकरेंचा सरकारला सवाल

News Desk

पाकिस्तान सीमेवर वाढत आहे मुस्लिम लोकसंख्या !

News Desk