HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात या”, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भावनिक साद

बीड | मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस यांसह तूर, मूग, उडीद आदी खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. मराठवाड्यातील पावसाने निर्माण केलेल्या या विदारक दृश्याची पाहणी करायला या, असे नम्र आवाहन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

सोयाबीनचे खळे सुरू असताना आलेल्या तुफान पावसामुळे एक शेतकरी कुटुंब पाण्यात भिजत असलेले सोयाबीन गोळा करून टोपलीत भरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हाच व्हिडिओ धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट केला असून पाण्यात वाहणारी सोयाबीन गोळा करताना व काळ्या पडलेल्या कापसाच्या एका एका झुडपाकडे पुन्हा पुन्हा वळून बघणाऱ्या बळीराजाला पाहून नक्कीच तुमच्याही पोटात गोळा येईल, असेही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना उद्देशून म्हटले आहे.

बळीराजा म्हणवल्या जाणाऱ्या अन्नदात्याच्या पाठीचा कणा नैसर्गिक संकटाने मोडून पडला असून या शेतकऱ्यांना सरकारने आधार व मदत देण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने जून ते ऑगस्ट दरम्यान पावसामुळे नुकसान झाले परंतु अतिवृष्टीच्या निकषात बसत नाही अशा शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीपोटी राज्यातील नऊ जिल्ह्यांना 755 कोटी रुपयांची मदत जाहीर केली व त्यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 17 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली होती. यावरूनही धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित क्षेत्राला मदत करतानाही बीड जिल्ह्यात पडलेला पाऊस त्या निकषात बसत नसल्याचे सांगून जिल्ह्याला मदतीतुन वगळले होते. त्याचीही आठवण करून देत धनंजय मुंडे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठवाड्यातील नुकसान बघण्यासाठी प्रत्यक्ष येण्याचे आवाहन केले आहे, याची दखल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेणार का? खरंच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रति आत्मीयता दाखवून ओला दुष्काळ किंवा तत्सम विशेष मदतीची राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील, काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं त्याची चर्चा करू – संजय राऊत

News Desk

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट १५ एप्रिलपासून होणार सुरु

News Desk

‘युवासेनेच्या संवाद मेळाव्यात गर्दी जमवणे पडलं महागात’, शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल!

News Desk