Site icon HW News Marathi

शिंदे-फडणवीस सरकारकडून बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू

मुंबई। नाराज असलेल्या आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि आमदार रवी राणा यांच्यातला वाद तर मिटला, पण मंत्रीपदावरून असलेल्या नाराजीचे काय? कारण बच्चू कडू यांची मंत्रीपदावरूनही शिंदे-फडणवीस सरकारवर नाराजी आहेच. पण संतप्त बच्चू कडू काय करू शकतात हे त्यांनी रवी राणांसोबत झालेल्या वादावरून दाखवून दिले. या काळात बच्चू कडू यांनी 7 ते 8 आमदार आपल्या संपर्कात असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर ठोस भूमिका घेतली नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेणार, असे स्पष्ट सांगत इशारा दिला. तसेच कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही करून दाखवले. आता याच शक्तीप्रदर्शनानंतर बच्चू कडूंना खुश करण्यासाठी त्यांना ५०० कोटींचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीसांचा आहे, असे म्हटले जाते. आता याचा अर्थ काय आणि बच्चू कडूंची नाराजी खरेच संपली का? हेही समजून घेऊया पण..
आधीच मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या बच्चू कडूंच्या नाराजीत भर पडली ती रवी राणांच्या 50 खोके आरोपांच्या ठिणगीची. ’50 खोके एकदम ओके’ हे शिंदे गट आणि भाजपच्या विरोधकांनी आणि विशेषतः ठाकरे गटाने गाजवलेलं वाक्य आता सर्वसामान्यांमध्ये सुद्धा कॉमन झालंय. जनता सुद्धा हे वाक्य अगदी सर्रासपणे बोलू लागलीय. रस्त्यावर, जाहीर सभेत, गावागावात, विधिमंडळात शिवसेनेने खोक्यांवरून शिंदे गटाला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे 50 खोक्यांचा प्रचार पहाता-पहाता राज्यभरात पोहोचला. हे वाक्य आता लोकांच्या तोंडी बसले. पण यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत मर्जीतले मानले जाणारे रवी राणा यांनीच खोक्यांचा आरोप केल्याने बच्चू कडू फारच दुखावले. राणांनी आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पण आमदारांनी 50 कोटी रूपये घेऊन बंडखोरी केली, असे नरेटीव्ह बाहेर जात असल्याने शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी मात्र वाढू लागलीय. कारण सरकार स्थापन होऊन चार महिने झाले. तरी 50 खोक्यांचा आरोप काय शिंदे-फडणवीसांना पुसता आलेला नाही. पण फडणवीसांच्या अत्यंत जवळचे रवी राणांनी शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर आरोप केल्याने या सरकारचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राणांमुळे कडू तर चांगले संतापलेच पण त्यांनी राणांसह सर्वांनाच आपला कडवटपणा दाखवून दिला. थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नोटीस देण्याची आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आणि आपणही काही कमी नाही, असे दाखवून दिले. या सर्वामुळे शिंदे गटात एकनाथ शिंदेंनंतर बच्चू कडूंच्या रूपाने दुसरा महत्त्वाचा चेहरा तयार झाला, अशीही चर्चा आहे. दरम्यान, मंगळवारी राणांसोबतचा आपला वाद संपला असे जरी त्यांनी म्हटले तरी आज चर्चा रंगली ती सरकारकडूनमिळणाऱ्या 500 कोटींच्या गिफ्टची!! राणा आणि त्यांच्यातली नाराजी संपली असे जरी ते म्हणत असले तरी मंत्रिपदाची नाराजी मात्र कायम आहे आणि म्हणूनच त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी आता शिंदे सरकारने खास भेट दिलीय. बच्चु कडू यांच्या अचलपूर मतदार संघातील सपन प्रकल्पाला 500 कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळेच बच्चू कडूंच्या मतदारसंघात ५०० कोटी रुपयांचा निधी देऊन त्यांना खुश करण्याचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या रंगलीय. सपन मध्यम प्रकल्पाला 500 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार असल्याचे सांगण्यात येते. पण तरी मंत्रीपदाचा प्रश्न सुद्धा कायम आहे. त्यामुळे हे निधीचे गाजर हे बच्चू कडूंची नाराजी तात्पुरती दूर करण्याचा प्रयत्न आहे, असेही म्हटले जाते. खरेतर कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सुरुवातीपासून  महत्वाची भूमिका घेतली होती. मात्र मंत्रिपदापासून डावलल्याने बच्चू कडू नाराज आहेत. अशात ५०० कोटींच्या निधीने नाराजीचे सत्र बदलणार की मंत्रिपदाची धडपडही कायम राहणार हे पाहणे महत्त्वाचे असेल.
Exit mobile version