Site icon HW News Marathi

राष्ट्रपतीपदासाठी आज मतदानाला सुरुवात; द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात कोण मारणार बाजी

नवी दिल्ली। देशाच्या १६ व्या राष्ट्रपती पदासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर यूपीएच्या वतीने माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा या दोघांमध्ये राष्ट्रपती पदासाठी आज (१८ जुलै) निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल २१ जुलै रोजी लागणार आहे. तर देशाचे नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेणार आहेत.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभेतील ५४३ आणि राज्यसभेतील २३३ या दोन्ही सभागृहातील एकूण ४८०९ खासदार मतदान करतील. यासाठी संसद भवनात ६ बूथ मतदानासाठी उभारण्यात आले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांचे मूल्य १० लाख, ८६ हजार, ४३१ एवढे आहे. दोन्ही सभागृहातील खासदारांचे प्रत्येक मताचे मूल्य ७०० एवढे आहे. त्यामुळे खासदारांच्या एकूण मताचे मूल्य ५ लाख ४३ हजार २०० एवढे आहे.
दरम्यान, एनडीएच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत 61 टक्क्यांपेक्षा जास्त लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे. यामुळे मुर्मू यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी निश्चित असल्याचे बोलले जाते. आदिवासी समाजातील राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असणार आहेत.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, “राष्ट्रपती निवडणुकीत राज्यातूनही आम्हाला पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी NDA आणि मित्रपक्षांच्या उमेदवार असलेल्या द्रौपदीजी मुर्मू यांचा विजय मोठ्या मताधिक्क्यानं असेल, यात शंकाच नाही.”

 

Exit mobile version