Site icon HW News Marathi

“फोन पण लाव आणि कॅमेरा पण लाव असे सांगत नाही,” अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | “मी फोन पण लाव आणि कॅमेरा पण लाव असे सांगत नाही,” असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेता अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने नदी, नाल्यात पाण्याची पातळी वाढल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आला होता. यामुळे जिल्ह्यातील काही भागातील घरे पाण्याखाली गेली होती. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल (9 जुलै) दिल्ली दौऱ्यावर होते.

तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून राज्यातील हिंगोली जिल्ह्यात पूर परिस्थितीचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजित पवार म्हणाले, “आपल्याला माहिती नाही, हे तर मी सुरुवातपासून करत आलोय. फक्त मी असे कॅमेरा लावत नाही. माझे मी काम करत असतो. तुम्ही पुणेकर मीडियाचे लोक आणि महाराष्ट्रातील लोकांना अनेकदा माहिती असेल. ओळखता की मी कोणतेही काम आले की, लगेच लाव फोन म्हणतो, परंतु, फोन लावताना, फोन पण लाव आणि कॅमेरापण लाव असे सांगत नाही.” अजित पवार हे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील एका पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदेवर टीकास्त्र सोडले.

 

 

 

 

Exit mobile version