Site icon HW News Marathi

विनायकराव मेटेंच्या अकाली निधनाने मी एक मार्गदर्शक व मित्र गमावला! – धनंजय मुंडे

बीड | बीड जिल्ह्यातील धडाडीचे नेते आणि शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. विनायक मेटे अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याची व माझी व्यक्तिगत देखील हानी झाली आहे, मी एक मार्गदर्शक व मित्र गमावले. त्यांचे मराठा आरक्षण, ऊसतोड कामगारांचे प्रश्न यातील योगदान कधीही विसरता येणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

धनंजय मुंडे व विनायकराव मेटे यांचा अत्यंत जवळचे स्नेहसंबंध होते. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी त्यांच्यात अनेकवेळा सकारात्मक संवादही होत असे. शिवस्मारक समिती, मराठा आरक्षण आदी विषयांमधून मेटे यांनी आपल्यातील नेतृत्व गुण दाखवून दिले होते. केज तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या विनायकरावांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून आपले आमदार निवडून आणले, याचा मित्र म्हणून नेहमीच अभिमान वाटायचा. ईश्वर मेटे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशा भावनिक शब्दात धनंजय मुंडे यांनी विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, माजी आ. विनायकराव मेटे यांचे आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघाती निधन झाले होते. मागील अनेक वर्षे तर विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम करत होते. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version