HW News Marathi
राजकारण

मल्लिकार्जुन खरगे यांची मोदींसह भाजप, संघावर सडकून टीका

जळगाव | काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवारी फैजपूर येथून सुरुवात झाली आहे. मागील निवडणुकीत मोदींनी केवळ आश्वासने देऊन मते मागितली. मात्र त्यांना त्यातले एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. खोटे बोलणे हे मोदी यांचे काम आहे, अशा कडक शब्दात यावेळी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतर असंख्य नेते, कार्यकर्त्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे. दुसरीकडे देशभक्तीचा आव आणणाऱ्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी बलिदान दिले आहे काय ? त्यांनी देशासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप सरकार आणि संघावर टीका केली आहे.

एकीकडे काँग्रेसने आपल्या कार्यकाळात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेचे जाळे पसरवले होते. दुसरीकडे पंतप्रधान मोदी मात्र केवळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणण्याचा दिखावा करून प्रशंसा मिळविण्याचा करीत आहेत. भाजप सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा केवळ वापर करीत आहे. हे सरकार देशाचे संविधान फाडणाऱ्यांना वारंवार पाठिशी घालत असते. त्यामुळे त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही. ते फक्त मतांसाठी त्यांच्या नावाचा वापर करत आहे, अशी टीकाही खरगे यांनी यावेळी केली आहे.

शेतकरी आत्महत्या, दलित यासारख्या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. महिला-बालके यांच्या सुरक्षिततेबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. या प्रश्नांवर पंतप्रधानांनी संसदेत बोलावे अशी आमची मागणी आहे. मात्र आमच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून संसदेत मोदी हात बांधून शांत बसून राहतात, असे खरगे यांनी सांगितले. देशातील दिवसेंदिवस वाढणारी महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमती यांसारख्या समस्यांवर पंतप्रधान मोदी कधीही बोलत नाहीत. पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी ते भाषण करत फिरत आहेत.

Related posts

महाविकास आघाडीकडे सर्वाधिक सरपंच आणि जागा! – अजित पवार

Aprna

शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकला

News Desk

पवारांचे प्रयत्न निष्फळ, उदयनराजे-निंबाळकरांमधील वाद टोकाला

News Desk