Site icon HW News Marathi

माझ्या विनंतीला मान देऊन भाजपने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार! – राज ठाकरे

मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East by-election) भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेवारी मागे घेतल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज पत्रकार परिषदेतून केली. “काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतशः आभार.” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्र लिहिले आहे.

“भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील (Andheri East by-election) आपला उमेदवार मागे घ्यावा. आणि भाजपने ही निवडणूक लढवू नये,” असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केले होती. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांची आज  महत्वाची बैठक पार पडली. यानंतर प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन उमेवारी अर्ज मागे घेणार असल्याचे सांगितले.

राज ठाकरेंनी पत्रात म्हटले, “अंधेरी (पूर्व) पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी हीच आमची धारणा!”

 

राज ठाकरेंनी पत्रात म्हटले

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
राज ठाकरे

दि. १७ ऑक्टोबर २०२२
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस
उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!

काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतशः आभार.
चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार..!

आपला मित्र,
राज ठाकरे

 

संबंधित बातम्या

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली घोषणा

राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“भाजपने ही निवडणूक लढवू नये”, पत्र लिहून राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केले आवाहन

Exit mobile version