Site icon HW News Marathi

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची ‘मविआ’ सरकारवरील टीका खोटी आणि दिशाभूल करणारी! – अजित पवार

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर भाजपशी युती केली. तेव्हापासून सातत्याने महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी असल्याचा आरोप केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मी भेदभाव करत असल्याचेही अनेकजण बोलत होते. वास्तविक मी सरकारमध्ये काम करत असताना कधीही, कोणताही भेदभाव केला नाही, अशी स्पष्टोक्ती विरोधी पक्ष नेता विधिमंडळ अजित पवार यांनी विधानसभेत केली. पूर्वी एक कोटी असलेला आमदार निधी वाढवत नेऊन आता पाच कोटी केला आहे. तरीही सातत्याने मी अन्याय केला असल्याचे सांगण्यात येत आहे, यात कोणतंही तथ्य नसल्याचे अजित म्हणाले. सरकारच्या विश्वास दर्शक ठरावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभाराच्या प्रस्तावावर बोलत असताना त्यांनी सरकार ज्या पद्धतीने बनले त्यावर जोरदार टीका केली.

अजित म्हणाले, “महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याला १२ हजार कोटी दिलेले आहेत. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याला किती निधी दिला, याची आकडेवारीच त्यांनी सभागृहात वाचून दाखवली. मंत्र्यांना निधी देताना शेवटी मुख्यमंत्र्यांचीच मंजुरी लागते हे देवेंद्र फडणवीस यांना चांगले माहीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर होत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे अजितदादांनी सांगितले.

मागच्या आठवड्याभरात राज्यपाल भलतेच अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयात सदस्यांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय प्रलंबित असताना विश्वासदर्शक ठराव घेणे उचित होते का? ठराव इतक्या घाईत आणण्याची गरज नव्हती, असे अनेक घटनातज्ज्ञ सांगत आहेत. मागच्या काळात आमचे सरकार असताना आम्ही अनेकदा राज्यपालांकडे जात होतो. विधान परिषदेच्या १२ आमदारांचा प्रलंबित निर्णय त्यांनी घेतला नाही. अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावावरही त्यांनी निर्णय दिला नाही. मात्र आज ते भलतेच सक्रीय झाले आहेत, असे शरसंधान अजित पवारांनी साधले.

तसेच शिवसेना फोडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा शिवसैनिकांनी फुटीर नेत्यांचा टिकाव लागू दिला नाही. भुजबळ साहेब देखील शिंदे यांच्याप्रमाणे आमदार घेऊन बाहेर पडले होते. मात्र आमदार निवडून आले नाहीत. नारायण राणे यांच्यासोबत देखील तेच झाले, याची आठवणही अजित यांनी करुन दिली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मागच्या दहा-बारा दिवसांत सूरत, गुवाहाटी वरुन गोव्याला जावे लागले. मला वाटतं अख्ख्या हयातीमध्ये हे आमदार एवढे फिरले नसतील. भविष्यात जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बंडखोर आमदारांना शिवसैनिक आणि जनतेला सामोरे जावे लागेल, असे अजित यांनी स्पष्ट केले. यशवंतराव चव्हाण साहेबांना साजेसा कारभार करावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, शिंदे यांचा आजवरचा प्रवास कौतुकास्पद आहे. रिक्षा चालकापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे, हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. पण त्यांनी पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून हे पद मिळवले असते तर अधिक बरे झाले असते. शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण देखील सातारा जिल्ह्याचे होते. ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत पद्धतीने राजकारण केले, त्याप्रमाणेच चव्हाण साहेबांना शोभेल असे काम आपल्या सर्वांना करायचे असल्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

संबंधित बातम्या
राज्यातील साडेबारा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी विरोधीपक्ष नेता म्हणून अजितदादा पवार काम करतील! – जयंत पाटील
शिंदे सरकारने बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा केली पास; तर महाविकास आघाडी फेल
Exit mobile version