Site icon HW News Marathi

“सात पानापैकी चार पाने हे आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच”, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला

मुंबई | “विरोधी पक्षांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत सातपानी पत्र दिले आहे. सात पानापैकी चार पाने हे बहुदा आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच आहेत. यातील अक्षरात फेरफार नाही, शब्दांमध्येही फार  फेरबदल नाही येत,”  असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी विरोधी पक्षांना आज  घेतलेल्या पत्रकार परिषदेतून घेतले आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन चहापानावर बहिष्कार टाकत असून त्याची कारणे काय आहेत, याचे सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांना दिले. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज (16 ऑगस्ट) संयुक्त पत्रकार परिषद खरपूस समाचार घेतला.

फडणवीस म्हणाले, “आम्ही चहापान्याचा कार्यक्रम ठेवला होता. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे. आणि सात पानी पत्र आम्हाला पाठविले आहे. यातली मधली चार पाने बहुदा आम्ही यापूर्वी दिलेल्या पत्रातीलच आहेत. यातील अक्षरात फेरफार नाही, शब्दांमध्येही फार  फेरबदल नाही येत. त्यामुळे मला असे वाटते की, हे पत्र देताना विरोधी पक्षाला या गोष्टीची विस्मृती झाली की ते दीड महिन्यापूर्वी सत्तेत होते. पण काही हरकत नाही, मला असे वाटते की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व जे मंत्रिमंडळ आज कार्यरत आहेत. या मंत्रिमंडळावर विरोधी पक्षाचाही विशेष विश्वास दिसतो. त्यामुळे जे जे त्यांनी केले नाही. त्या सर्व अपेक्षा विरोध पक्षांनी आमच्याकडून व्यक्त केल्या आहेत. मी विरोधी पक्षांना आश्वस्त करू इच्छितो की आमचे शिवसेना-भाजप युतीचे सरकार त्यांच्या या सर्व आपेक्षा निश्चितपणे पूर्ण करणे, ” असे आश्वासन त्यांनी दिले.

 

अजित पवार नेमके काय म्हणाले

अजित पवार म्हणाले, “राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. सरकारची वैधता संदिग्ध असल्याने, सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी व राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर आम्ही सर्वजण बहिष्कार टाकत आहे.”  अजित पवार पुढे म्हणाले, “उद्यापासून सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी चहापानावर बहिष्कार टाकत असून त्याची कारणे काय आहेत, याचे सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांना दिले.”

संबंधित बातम्या

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार! – अजित पवार

Exit mobile version