Site icon HW News Marathi

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कामाला गती देणार! –  तानाजी सावंत

मुंबई | अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय हे या जिल्ह्यातील गर्भवती महिला, प्रसृत माता तसेच नवजात बालकांसाठी आरोग्य संजीवनी आहे. या रुग्णालयात केवळ अमरावतीच्या नव्हे तर धारणी, मेळघाटासह अनेक महिला उपचारांसाठी येत असतात, त्यामुळे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (Women’s Hospital) कामाला गती देण्यात येईल असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य ॲड. यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, विकास ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे अमरावती रुग्णालयाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

प्रा.डॉ. सावंत म्हणाले की,अमरावती येथे सध्या 189 खाटांचे रुग्णालय कार्यान्वित आहे.28 ऑगस्ट 2009 च्या शासन निर्णयानुसार अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयास 189 खाटांवरुन 400 खाटा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय 12 एप्रिल 2013 च्या शासन निर्णयानुसार याच रुग्णालयात अतिरिक्त 200 खाटांच्या बांधकामाकरिता 45 कोटी 61 लाख 58 हजार इतक्या रकमेच्या अंदाजपत्रक आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम 90 टक्के पूर्ण झाले असून इमारतीस विद्युतीकरण आणि अनुषंगिक कामे करण्यात येत आहेत. याशिवाय वाढीव 200 खाटांकरिता अतिरिक्त मनुष्यबळाकरिता पदनिर्मितीचा प्रस्ताव आयुक्तालयाकडून अप्राप्त आहे.

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 400 खाटांच्या नतून इमारतीमध्ये भौतिक सुविधांची कामे आणि आरोग्य साधनांची पूर्तता यावर भर देण्यात येत आहे. मे 2023 पर्यंत रुग्णालय बांधकामाचे काम पूर्ण करण्यात येईल. यानंतर इलेक्ट्रिक काम 1 महिन्यात पूर्ण करण्यात येईल. याच दरम्यान आवश्यक उपकरण खरेदी करण्याचे काम येत्या दीड महिन्यात करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार पदभरतीलाही गती देण्यात येईल. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये फेज 2 इमारतीमध्ये न्युरोसर्जरी आणि कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी युनिट यासाठी लागणारा आवश्यक निधी पुरवणी मागणीद्वारे मागण्यात येईल, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version