Site icon HW News Marathi

“शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर ‘नेते पदा’ला कुठलीही किंमत राहीली नाही”, रामदास कदम यांचा राजीनामा

मुंबई | शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कदम यांनी नेते पदाचा राजीनामा दिला आहे. “शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं,” अशी टीका कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली. याआधी कदम यांनी पत्रकार परिषद पक्षात त्यांना मिळणाऱ्या वागणुकीवरून बोलले होते. यानंतर कदम यांनी आज (18 जुलै) उद्धव ठाकरे लिहून राजीनामा देत त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

कदम म्हणाले, “आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले.” कदम पुढे असे म्हटले,  “विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणही कितीही टिका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मिडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.”

रामदास कदम यांनी पत्रात नेमके काय म्हणाले

प्रति

सन्माननीय श्री. उध्दवजी ठाकरे,

यांसी

जय महाराष्ट्र !

शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं.

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले.

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणही कितीही टिका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मिडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.

२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोयत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल. अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज “शिवसेना नेता ” या पदाचा राजीनामा देत आहे.

आपला
(रामदास कदम)

 

Exit mobile version