HW News Marathi
राजकारण

मसूद प्रकरणी मोदींनी पाकिस्तानचे दात घशात घातले, कमाल झाली !

मुंबई | पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला १ मे रोजी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने या प्रकरणी भाष्य केले आहे. “मसूदप्रकरणी मोदी यांनी पाकिस्तानचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत ! कमाल झाली”, असे म्हणत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदींना देत शिवसेनेने पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुक केले आहे. “मोदी यांनी आधी बालाकोटवर एअर स्ट्राइक केले व आता ‘युनो’कडून मसूदची घेराबंदी केली. त्याबद्दल कश्मीरातील फुटीरतावाद्यांना अश्रू आवरणे कठीण झाले हे मान्य, पण महान परंपरा वगैरे असलेल्या काँग्रेसलाही हुंदके फुटावेत याचा काय अर्थ घ्यावा?”, असा सवाल करत शिवसेनेने काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे.

काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?

मोदी यांनी आधी बालाकोटवर एअर स्ट्राइक केले व आता ‘युनो’कडून मसूदची घेराबंदी केली. त्याबद्दल कश्मीरातील फुटीरतावाद्यांना अश्रू आवरणे कठीण झाले हे मान्य, पण महान परंपरा वगैरे असलेल्या काँग्रेसलाही हुंदके फुटावेत याचा काय अर्थ घ्यावा? दाऊद, हाफिज आणि मसूद हे देशाचे गुन्हेगार आहेत. त्यांची घेराबंदी झाली आहे. त्यांना फरफटत आणलेही जाईल. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे, ‘‘अभी तो शुरूआत है, आगे आगे देखिए क्या होता है?’’ मोदी काय करतात ते पाहायला हवे. मोदी हे देशाला लाभलेले खंबीर नेतृत्व आहे असे लोकांना वाटते ते यामुळेच. मसूदप्रकरणी मोदी यांनी पाकिस्तानचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत! कमाल झाली!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने पुन्हा कमाल केली आहे. त्यांनी आधी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले व आता पाकडय़ांना मदत करणाऱया चीनची भिंत तोडली आहे. मोदी है तो मुमकीन है. त्यांना काहीच अशक्य नाही हे मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित करायला लावून मोदींनी सिद्ध केले आहे. मसूद अझर हा हिंदुस्थानचा पहिल्या क्रमांकाचा दुश्मन आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो म्होरक्या आहे. कश्मीरातील दहशतवादी कारवायांत तर तो आहेच, पण मुंबईतील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्याचाही तोच सूत्रधार आहे. हिंदुस्थानचे तुकडे तुकडे करण्याचे त्याचे स्वप्न आहे व त्यासाठी त्याने अनेक कारस्थाने अमलात आणली. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्यात हाच सैतान होता. त्यात आमचे चाळीस जवान शहीद झाले. पुन्हा या हल्ल्याची जबाबदारी मसूद अझरने घेतली तरीही काँग्रेसचे पुढारी व मोदी विरोधकांचा आरोप असा की, पुलवामाचे हत्याकांड लोकसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून घडवून आणले गेले. याप्रकरणी त्यांनी थेट पंतप्रधानांवरही फालतू आरोप केले. हा सर्व प्रकार गलिच्छ राजकारणाचा आहे. मसूद अझर हा जणू मोदी विरोधकांचा जावई आहे व या जावयास जागतिक दहशतवादी घोषित करून काय मिळवले? असा प्रश्न काँग्रेसने विचारावा हे देशाचे दुर्दैव आहे. पाकिस्तानात

दहशतवाद घडविण्याची फॅक्टरी

आहे व मसूद अझर त्या फॅक्टरीचा मुख्य संचालक आहे. पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसांतच अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी ‘युनो’त अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता व फक्त चीनने विरोध केल्यामुळे तो प्रस्ताव रद्द झाला होता. चीनच्या दृष्टीने मसूद अझर हा दहशतवादी नसून एक उद्योजक आहे. मसूद अझर हा हिंदुस्थानात अस्थिरता निर्माण करतो. म्हणजे एका परीने जे चीनला हवे तेच तो करतो. त्यामुळे चीनला मसूद अझर प्रिय असावा. आता या प्रेम प्रकरणातही शेवटी हिंदुस्थानचाच विजय झाला व मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव चीनला मान्य करावा लागला. हिंदुस्थानच्या मुत्सद्देगिरीचाच हा विजय आहे. जागतिक आतंकवादी मसूद हा पाकिस्तानच्या भूमीवर असणे ही आता पाकसाठी मोठीच डोकेदुखी ठरणार आहे. मसूद अझरला ‘युनो’चा सदस्य असलेल्या देशात प्रवास करता येणार नाही. या देशातील त्याची चल-अचल संपत्ती जप्त केली जाईल, त्याची कोंडी होईल, एवढेच नव्हे तर एका जागतिक दहशतवाद्यास पाकच्या जमिनीवर पाळले-पोसले जात आहे म्हणून पाकिस्तानला आरोपीच्या पिंजऱयात उभे राहावे लागेल. पाकपुरस्कृत दहशतवादाचे समर्थन करणे अखेर चीनलाही जमले नाही. चीनची भिंत तुटली हे पंतप्रधान मोदी यांच्यामुळे शक्य झाले व भिंत तोडण्याचे श्रेय त्यांनी घेतले तर

काँगेसच्या पोटात दुखण्याचे

कारण नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी तर कमाल केली. मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे ‘टायमिंग’ योग्य आहे काय? अशी शंका त्यांनी उपस्थित केली. येथे टायमिंगचा प्रश्न येतोच कोठे? देशात निवडणुका सुरू आहेत व या घटनांचा फायदा मोदी यांना मिळेल अशी भीती त्यांना वाटत असावी. आता हेच ‘टायमिंग’ का? हा प्रश्न कमलनाथ यांनी ‘युनो’त जाऊन विचारायला हवा. दहशतवाद्यांशी लढताना भावना आणि टायमिंगचा विचार करायचा नसतो. मैदानावर आणि कागदांवर थेट हल्ला करायचा असतो. मोदी यांनी आधी बालाकोटवर एअर स्ट्राइक केले व आता ‘युनो’कडून मसूदची घेराबंदी केली. त्याबद्दल कश्मीरातील फुटीरतावाद्यांना अश्रू आवरणे कठीण झाले हे मान्य, पण महान परंपरा वगैरे असलेल्या काँग्रेसलाही हुंदके फुटावेत याचा आम्ही काय अर्थ घ्यावा? दाऊद, हाफिज आणि मसूद हे आमच्या देशाचे गुन्हेगार आहेत. त्यांची घेराबंदी झाली आहे. त्यांना फरफटत आणलेही जाईल. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे, ‘‘अभी तो शुरूआत है, आगे आगे देखिए क्या होता है?’’ मोदी काय करतात ते पाहायला हवे. मोदी हे देशाला लाभलेले खंबीर नेतृत्व आहे असे लोकांना वाटते ते यामुळेच. मसूदप्रकरणी मोदी यांनी पाकिस्तानचे दात त्यांच्याच घशात घातले आहेत! कमाल झाली!!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन; असा आहे मुंबई दौरा

Aprna

पुण्यात गिरीश बापट यांच्याविरोधात पाणी प्रश्नावरून बॅनरबाजी

News Desk

भाजपच्या राज्य कार्यकारिणीकडून एकनाथ खडसेंना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी

News Desk