HW News Marathi
राजकारण

‘क्रांती गाथा‘ हे आधुनिक तीर्थस्थळ म्हणून सर्वांना परिचित होईल! – मुख्यमंत्री

मुंबई। स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उदघाटन हा एक योगायोगच नाही तर एक  चांगला मुहूर्त आहे. क्रांतीगाथा हे आधुनिक तीर्थस्थळ  म्हणून सर्वांना परिचित होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राजभवन येथे ‘क्रांती गाथा‘ भूमिगत दालन व  राज्यपालांच्या ‘जलभूषण‘ निवासस्थानाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

 यावेळी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे म्हणाले,   ‘दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझे जुळती‘ असे म्हटले जाते. जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यासाठी कितीजणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले, किती जणांनी बलिदान दिले, कितीजणांनी मरण यातना सोसल्या,  क्षणभर विचार केला हे असे घडले नसते तर  आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकलो असतो का हा प्रश्न मनात येतो. आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळाले, ते कुणी आपल्याला आंदण नाही दिले हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावे लागले आहे. तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणे हे आपलं काम आहे. काळ पुढे जात आहे. आपण पारतंत्र्यात १५० वर्षे होतो आता  स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, पुढे जात असतांना हा वारसा पुढच्या पिढीला देण्याच काम केले नाही तर मला वाटते आपण आपल्या कर्तव्याला मुकतो आहोत. आज एक अप्रतिम काम आपण करत आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, २०१६ ला हे भुयार सापडले. खंदक आणि भुयाराचा आज अप्रतिम उपयोग होतो आहे.  तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी हे भुयार बघण्यास बोलावले होते. आता जी फिल्म बघितली त्यात याला तीर्थस्थळ म्हटले आहे.  हे एक तीर्थस्थळच आहे. महाराष्ट्रदिनी आपण एक पुस्तक प्राथमिक स्वरूपात तयार केले आहे अजून ते पूर्ण व्हायचे आहे. माहिती गोळा होतेय. ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांचे ज्यांनी देशासाठी त्याग केला त्यांचे संकलन व्हायला पाहिजे म्हणून एक पुस्तक आपण तयार करत आहोत. नुसते बोलत बसण्यापेक्षा क्रांतीकारकांनी ज्या गोष्टी केल्या त्यांच्या त्यागाच्या एक कण जरी काम आपण करू शकलो तरी त्यांचे बलिदान कृतार्थ होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘जलभूषण‘ या राज्यपालांच्या निवासस्थानाचे लोकार्पणही काल (१४ जून) होत आहे. काळ बदलत असला तरी या परिसराने इतिहासाच्या पाऊलखुणा नेहमीच जपल्या आहेत.  त्याला धक्का न लावता नुतनीकरण करणं, आधुनिक तंत्रज्ञानाने हे काम करणे खुप मोठी गोष्ट आहे. कलात्मक नजरेने  याकडे पहातांना प्रत्येक ठिकाणी त्याचे सौंदर्य दिसते. इतक्या चांगल्याप्रकारे हे नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. मला या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित रहाता आले हा माझ्यासाठी सार्थकतेचा क्षण आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यावेळी म्हणाले.

स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी जागवणारा ब्रिटिश कालीन बंकर

 

‘क्रांती गाथा‘ हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांना समर्पित असलेले असे भूमिगत दालन आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सन २०१६ साली राजभवन येथे सापडलेल्या ब्रिटिशकालीन बंकरमध्ये ‘क्रांती गाथा’ या दालनाची निर्मिती करण्यात आली आहे. इतिहासकार व लेखक डॉ विक्रम संपत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नागपूर येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या मदतीने ‘क्रांती गाथा‘ दालन निर्माण करण्यात आले आहे.‘क्रांती गाथा‘ या दालनामध्ये १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून १९४६ साली मुंबई  येथे नौदलात झालेल्या उठावापर्यंतच्या कालावधीतील महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारकांच्या आठवणी जागविण्यात येणार आहेत. यामध्ये वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, बाळ गंगाधर टिळक, वि. दा. सावरकर, बाबाराव सावरकर, क्रांतिगुरु लहूजी साळवे, अनंत लक्ष्मण कान्हेरे, मॅडम भिकाजी कामा, पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना ‘अभिनव भारत‘, ‘पत्री सरकार’, गणेश विष्णू पिंगळे, वासुदेव बळवंत गोगटे, शिवराम राजगुरु यांसह इतर अनेक क्रांतिकारकांचा समावेश असेल. शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या अनेक आदिवासी क्रांतिकारकांची छायाचित्रे व माहिती देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. दालनाच्या पुढील टप्प्यात आणखी काही क्रांतिकारकांची माहिती दिली जाणार आहे. ब्रिटिश राजवटीविरुद्ध महाराष्ट्रातून – त्यावेळच्या मुंबई राज्यातून – दिल्या गेलेल्या सशस्त्र लढ्याची गाथा  या ठिकाणी शिल्पे, दुर्मिळ छायाचित्रे व भित्तिचित्रे यांच्या माध्यमातून दाखविली जाणार आहे. राज्य पुराभिलेख विभाग, एशियाटिक सोसायटी, केसरी पुराभिलेख, व मुंबईतील सावरकर संग्रहालयातून यासाठी माहिती मिळविली आहे. या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखील देखावा निर्माण करण्यात आला आहे.

भूमिगत बंकरचा पूर्वेतिहास

दिनांक १६ ऑगस्ट २०१६ रोजी राजभवनातील हिरवळीखाली भव्य ब्रिटीश कालीन बंकर असल्याचे तत्कालीन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना आढळले. त्यानंतर लगेचच त्यांनी बंकरची पाहणी करून त्याचे जतन करण्याचे आदेश दिले होते. पहिल्या महायुद्धापूर्वी बांधण्यात आलेल्या या बंकरची वास्तू अनेक वर्षे बंदिस्त असल्यामुळे दुर्लक्षित होती. सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्य दृष्टीने असुरक्षित झाली होती. ही ऐतिहासिक वास्तू राजभवनाचा वारसा असल्यामुळे तसेच तिच्या वरील बाजूस राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली ‘जलभूषण’ ही वास्तू उभी असल्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करणे आवश्यक होते. या दृष्टीने भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. या बंकरमध्ये विविध आकारांचे १३ कक्ष असून बंकरच्या सुरुवातीला २० फूट उंच भव्य प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रदीर्घ उतार (Ramp) आहे. बंकरचा शोध लागला त्यावेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार (Cartridge Store), शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती. बंकरमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तसेच शुध्द हवा व नैसर्गिक प्रकाशाची योग्य व्यवस्था असल्याचे आढळले. बंकरमध्ये जागोजागी दिव्यांसाठी जागा (Lamp Recess) ठेवण्यात आल्या होत्या. बंकरचे संवर्धन करताना तसेच आता त्या ठिकाणी क्रांतिकारकांचे दालन करताना सर्व मूळ वैशिष्ट्ये जतन करण्याची काळजी घेण्यात आली आहे. दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र एकूण १३ कक्ष असलेल्या बंकरमधील अनेक कक्ष रिकामे होते. ‘क्रांती गाथा’ दालनासाठी यातील अनेक कक्षांचा तसेच मार्गीकेतील भिंतीचा उपयोग करण्यात आला आहे.

‘जलभूषण‘ निवासस्थान

 

जलभूषण या वास्तूला किमान २०० वर्षांचा इतिहास आहे. मुंबईचे गव्हर्नर माउंटस्टूअर्ट एलफिन्स्टन यांनी मलबार हिल येथे सन १८२० – १८२५ या काळात ‘प्रेटी कॉटेज’ नावाचा छोटा बंगला बांधला होता. ‘जलभूषण’ ही वास्तू याच जागेवर उभी आहे. सन १८८५ साली मलबार हिल येथे ‘गव्हर्न्मेंट हाउस’ स्थलांतरित झाल्यापासून या वास्तूमध्ये ब्रिटीश गव्हर्नर यांचे व स्वातंत्र्यानंतर मुंबईच्या व राज्यनिर्मितीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान राहिले आहे. अनेकदा बांधली गेलेली व विस्तारित केलेली ही वास्तू निवासासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आल्यामुळे या ठिकाणी नवी वास्तू बांधण्याचे ठरविण्यात आले.  १८ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या ‘जलभूषण’ इमारतीची पायाभरणी देखील केली होती. हे बांधकाम पूर्ण झाले असून नव्या वास्तूचे द्वारपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.नवीन ‘जलभूषण’ वास्तूमध्ये जुन्या वास्तूमधील ठळक वारसा वैशिष्ट्ये जतन करण्यात आली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालकमंत्री राम शिंदे यांचा शेतक-यांना अजब सल्ला !

News Desk

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

दिवाळीत ‘या’ मार्केटमध्ये करा खरेदी…

News Desk