Site icon HW News Marathi

थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

मुंबई । राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी बुधवारपासून (९ नोव्हेंबर) आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे केली.

मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या : अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदूर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

Exit mobile version