Site icon HW News Marathi

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही; छगन भुजबळ यांच्यासह ‘मविआ’चा सभात्याग

मुंबई  | राज्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) प्रचंड नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) होत असताना राज्याच्या कृषीमंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या अशी मागणी करत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात नियम ५७ अन्वये प्रस्ताव मांडला. तो चर्चिला गेला नसल्याने त्यांनी सभागृहाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांना घोषित करण्यात आलेली नाही. सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. शेतकरी अडचणीत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावर राज्याच्या कृषीमंत्र्यांनी संवेदनाहीन अशी टिप्पणी केली. ही बाब अतिशय दुर्दैवी असून या वक्तव्याचा छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी १२०० रुपये खर्च येत आहे. मात्र कांद्याला आज ५०० रुपये तर जास्तीत जास्त ७०० रुपये भाव मिळत आहे ही सद्याची परिस्थिती आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने केवळ ३०० रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान देण्यात यावे मात्र सरकार ३०० रुपयांवर ठाम राहिल्याने सभात्याग करण्यात आला.

Exit mobile version