Site icon HW News Marathi

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; विरोधकांची घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणला

मुंबई | बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा… बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा (Maharashtra Budget) निषेध केला. राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

 

या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादीचे आमदार भोपळा डोक्यावर घेऊनच शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर पायर्‍यांवर आंदोलन केले.

 

अर्थसंकल्पात ५ लाख ४७ हजार ४५० कोटींची तरतुद

राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत आज सादर केला. या अर्थसंकल्पानुसार महसुली जमा ४ लाख ४९ हजार ५२२ कोटी तर महसूली खर्च ४ लाख ६५ हजार ६४५ कोटी आहे. महसूली तूट १६ हजार ११२ कोटी तर राजकोषीय तूट ९५ हजार पाचशे कोटी ८० लाख रुपये इतकी आहे.

Exit mobile version