HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

शिवसेना-वंचित युतीचा फायदा कुणाला? प्रबोधनकार ठाकरेंपासून ‘भीमशक्ती-शिवशक्ती’ प्रयोग

आरती घारगी, मुंबई | “शिवसेना आणि आमचा निर्णय झाला आहे, आता केवळ आम्हाला एकत्रितपणे जाहीर करायचं बाकी आहे”, काल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य करून मागील १ महिन्यापासून सुरु असलेल्या राजकीय चर्चांवर शिक्कामोर्तब केलं. गेल्या नोव्हेंबरमध्ये प्रबोधनकार ठाकरेंशी संबंधित एका कार्यक्रमाच्या वेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर दिसले. याच कार्यक्रमात ठाकरेंनी आंबेडकरांना युती करण्याची जाहीर साद सुद्धा घातली. त्यानंतर या दोघांची अनेक वेळा भेट झाली. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांच्या बोलण्या सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचं हे कालचं वक्तव्य भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार हेच सांगणारं आहे. आगामी BMC ची निवडणूक ही या युतीची पहिली टेस्ट असणार आहे.

प्रकाश आंबेडकरांनी तर जेवढ्या जागा शिवसेना द्यायला तयार आहे, तेवढ्या जागा आम्हाला मान्य आहेत, असं सुद्धा जाहीर केलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक नवीन प्रयोग आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण शिवसेना-वंचित युतीचा फायदा होईल का? झाला तर तो कोणाला होईल? हे नवीन समीकरण महाविकास आघाडीत फिट बसेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.

घटनाकार आणि प्रबोधनकार

२०१९ पासून महाराष्ट्राने आतापर्यंत अगदी अनपेक्षित अशी राजकीय समीकरणं पहिलीत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची महाविकास आघाडी असो किंवा अगदी अलीकडची शिंदे-फडणवीस यांची युती. त्यामुळे जर हिंदुत्वववादी शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि आंबेडकरवादी वंचित बहुजन पक्षाचे प्रकाश आंबेडकर एकत्र आले, तर यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, उद्धव ठाकेरेंकडे तसा दुसरा पर्यायसुद्धा नाही. पण असे जरी असले, तरी शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग हा आजचा आहे, असं नाही. याआधीही 1970 च्या दशकात असाच प्रयोग बाळासाहेब ठाकरेनी केला होता.
तरी दोन वेगळ्या विचारधारेनी एकत्र येण्यामागे यापेक्षाही जुना इतिहास आहे.

उद्धव ठाकरे म्हणजे केशव ठाकरेंचे नातू आणि प्रकाश आंबेडकर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू. एक प्रबोधनकार तर दुसरे घटनाकार. दोघेही समकालीन. दोघेही मुंबईच्या दादरमधले. दोघांचा मित्रपरिवार देखील काही प्रमाणात समान होता. दोघांनीही ब्राह्मणी hierarchy ला त्यांच्या कार्यातून, लेखणीतून चॅलेंज केल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. दादरमधल्या सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात अस्पृश्यांच्या हातून पूजेची सुरुवात करायला प्रबोधनकारांनी सक्रिय पाठिंबा देणं असो किंवा प्रबोधनकारांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बाबासाहेबानी पाठिंबा देणं असो, इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत जी प्रबोधनकार आणि बाबासाहेबांचा एकमेकांना असणारा सपोर्ट दर्शवतात.

बाळासाहेब ठाकरेंचा शिवशक्ती-भीमशक्ती प्रयोग

पुढे प्रबोधनकारांचे पुत्र बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केल्यानंतरही शिवशक्ती आणि भीमशक्तीचे प्रयोग केले. १९७० मध्ये प्रजा समाजवादी पक्षासोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेनं रिपब्लिकच्या रा सु गवई गटासोबत युती केली. पण दलित पँथरच्या उदयानंतर, दलित पॅन्थर विरुद्ध शिवसेना हा संघर्ष वाढू लागला. १९८७-८८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथावरून वाद पेटला. यामध्ये सुद्धा दलित पॅन्थर आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले. पण बाळासाहेब ठाकरेंनी पडती बाजू घेतली आणि हा वाद मिटला. त्यानंतर मार्मिकच्या एका लेखात बाळासाहेबांनी ‘वाद झाला, आता संवाद साधू’ अशी सामंजस्याची भूमिकाही घेतली. पण शिवशक्ती आणि भीमशक्तीचा बहुचर्चित प्रयोग मात्र रामदास आठवले आणि शिवसेनेच्या २०११ च्या युतीने झाला. रामदास आठवले हे आता भाजपसोबत आहेत. पण प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेचा हा प्रयोग पुन्हा एकदा यशस्वी होणार का? हा प्रश्न तर आहेच.

शिवसेनेची निवडणुकीतील कामगिरी आपल्याला माहित आहेच, पण वंचित बहुजन आघाडीचं काय? २०१८ मध्ये या पक्षाच्या स्थापनेनंतर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचितने २ महत्त्वाच्या निवडणूक लढवल्या त्या म्हणजे २०१९ ची लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक. पहिल्याच लोकसभा निवडणुकीत वंचितने चांगली कामगिरी केली. या निवडणुकीत त्यांनी ओवैसींच्या AIMIM सोबत हातमिळवणी केली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जागांवर या पक्षाला लाखोंच्या संख्येत मत मिळाली होती. या निवडणुकीत एकूण ५० लाख मतं वंचितला मिळाली होती. त्यांचा वोट शेअर ४.५७% होता. विधानसभेत AIMIM सोबतची युती टिकली नाही तरी मुंबईतल्या अनेक जागांवर मनसेपेक्षा जास्त किंवा मनसे इतकेच वोट्स या पक्षाला मिळालेले दिसतात.

कुलाबा : 2.82%, वरळी : 5.9%, मुंबादेवी : 1.18%, सायन कोळीवाडा : 8.9%, घाटकोपर पूर्व : 8.27%, वांद्रे पूर्व : 2.3% इत्यादी

जरी हा वोट शेअर बाकी पक्षांच्या तुलनेत खूप कमी असला तरी शिवसेनेतील फूट आणि शिंदेंच्या बंडाने निर्माण झालेली पोकळी पाहता ठाकरे आता छोट्या पण महत्त्वाच्या वोट बँककडे लक्ष देताना दिसतायत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी बिहारचे तेजस्वी यादव यांची भेट घेणं हे मुंबईतल्या उत्तर भारतीय मतदारांना विचारात घेऊन केल्याचं दिसतं.

मग महाविकास आघाडीचं काय?

हा प्रश्न साहजिक आहे. कारण शिवसेना आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचा भाग आहे. आंबेडकरांची ही युती फक्त सेनेसोबत आहे की महाविकास आघाडीसोबत हे अजून स्पष्ट नाही. पण आंबेडकरांची आतापर्यंतची भूमिका ही राष्ट्रवादी आणि पवारांविरोधी राहिली आहे. दुसरीकडे जर फक्त सेनेसोबत युती झाली तर, BMC साठी सेना वंचितचा उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्ध उतरवणार का? हा सुद्धा प्रश्न आहे. महाविकास आघाडीसोबत युती झाली तर अनेक ठिकाणी खासकरून विदर्भात वंचित आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई बघायला मिळते, अशा जागांचं काय करणार? असे अनेक प्रश्न सेनेसमोर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही तारेवरची कसरतच म्हणायला हवी. दुसरीकडे शिंदेनी ठाकरेंच्या आधीच शिवशक्ती-भीमशक्ती प्रयोग केलाय. आज सकाळीच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर केली आहे. त्यामुळे, या २ भीमशक्ती- शिवशक्ती प्रयोगांपैकी कोणता वरचढ ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायावतींचा भाचा आकाश आनंद यांचा राजकारणात प्रवेश

News Desk

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश, शिक्षण विभागाचा निर्णय

News Desk

राज्यपालांचा सरकारी विमानातून गोव्याचा प्रवास,राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधील ‘तो’ वाद निवळला?

News Desk