HW News Marathi
राजकारण

भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? 

मुंबई | भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? आम्हाला महागाईत होरपळणार्‍या जनतेविषयी सहानुभूती आहे. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले. विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत? जनतेसाठी पुकारलेलाबंदहा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचाबंदठरू नये! असे म्हणत मित्र पक्ष असूनही आम्ही वारंवार जनतेसाठी आवाज उठविला आहे असे सांगत शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आजच्या भारत बंद वरुन कॉंग्रेसला टोला लगावला आहे. सामनाच्या संपादकीय मधून उद्धव ठाकरे यांनी आपण जनतेसाठी नेहमी आवाज उठवत असल्याचे म्हटले आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी ‘हिंदुस्थान बंद’ पुकारला आहे. देशभरात जो महागाईचा आगडोंब उसळला आहे, त्याबद्दल जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी हा ‘बंद’ असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे. देशभरातील अनेक प्रादेशिक पक्ष या ‘बंद’मध्ये सामील होत असल्याने हा ‘बंद’ काही प्रमाणात नक्कीच यशस्वी होईल. तसा तो व्हायलाही हवा. राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी हे पक्ष ‘बंद’मध्ये उतरले आहेत. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात ‘बंद’चा प्रभाव शंभर टक्के जाणवेल. ‘बंद’ची घोषणा राजकीय कारणासाठी नसून जनजीवनाशी संबंधित महागाईवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे. जनतेच्या प्रश्नांवर तरी विरोधी पक्षांचे गाठोडे नीट बांधले जात आहे काय हे उद्याच्या ‘बंद’निमित्ताने स्पष्ट होईल. महागाईचे चटके जनता रोज सोसत आहे. हे आता फक्त चटके राहिले नसून जनता महागाईच्या वणव्यात होरपळून निघाली आहे. सरणावरील चिता पेटवण्यासाठी जशी आग लागते तशीच ही आग असून जनतेला जाळून मारण्यासाठीच ही महागाईची आग लावली आहे. त्यामुळे या आगीने होरपळलेली जनता जागी नाही व तिला जागे करावे यासाठी हा ‘बंद’ आहे हे तत्त्वज्ञान पटणारे नाही. जनता जागीच आहे. ती 2019 साली सत्ताधार्‍यांचे लंकादहन करील. मोदींचे सरकार सर्वच आघाड्यांवर ‘फेल’ असल्याचे विरोधकांनी सांगितले आहे. इतर आम्हाला काही माहीत नाही, पण महागाईने जनतेला नागडे केले आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव

शंभरी पार

करतील. हे चित्र भयंकर आहे. महाराष्ट्राच्या परभणीत पेट्रोलचा भाव सर्वाधिक 90 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत 88 रुपये आहे. म्हणजे पेट्रोल लवकरच शंभरी गाठणार हे निश्चित आहे. त्यामुळे स्वयंपाकाचा गॅसही महागला. डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले की वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे धान्य, भाज्या, दूध, प्रवास अशा सर्वच गोष्टी सध्या महाग झाल्या आहेत. या परिस्थितीत जनतेने जगायचे कसे? महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, एक दिवस भाजपचे नेते होऊन दाखवा. मग सरकार चालवणे किती अवघड आहे ते कळेल. आमचे पाटलांना सांगणे आहे, सरकार व भाजपकडे चारही बाजूने पैसाच पैसा येत आहे व त्यावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. आम्ही सांगतो, भाजप नेते होणे सोपे आहे. एक दिवस होरपळीत सापडलेल्या सामान्य जनतेचे जीवन जगून दाखवा. ते शक्य आहे काय? सामान्य माणसाच्या नशिबी सध्या प्रवासातही खड्डा आणि पोटातही खड्डाच आला आहे. विरोधी पक्षाने ‘बंद’ पुकारला म्हणून त्यांच्या नावाने बोटे का मोडता? सरकारला शेतकर्‍यांचे संकट दूर करता आले नाही. 2014 मध्ये मोदी यांनी आश्वासन दिले होते की, देशात दोन कोटी नोकर्‍या दरवर्षी तरुणांना मिळतील, पण उलटेच झाले. प्रतिवर्षी 20 लाख नोकर्‍या कमी झाल्या आहेत. तरुणांना काम नाही, गृहिणींना स्वयंपाकाचा गॅस नाही. इंधनाचे दर रोजच वाढत आहेत. विकास दर वाढत असल्याची जाहिरात करता तशी इंधन दर रोजच वाढत असल्याचे

सरकारी फलकही

लावा. राहुल गांधी हे मांसाहार करतात म्हणून टीका करणार्‍यांनी वाढणार्‍या महागाईवर बोलायला हवे. भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? 2019 ला विरोधी पक्षात बसल्यावर नवा ‘बंद’ पुकारून ते महागाईवर बोलणार आहेत काय? महागाईचा प्रश्न जनतेच्या जीवन-मरणाचा आहे हे ज्यांना समजले तोच राज्यकर्ता. देशातील 22 राज्यांत भाजपची सरकारे आहेत. भाजपने मनात आणले तर पेट्रोल-डिझेलचे भाव ते नक्कीच खाली आणू शकतील, पण केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या व्यापारातून तब्बल सुमारे दोन लाख 29 हजार कोटी इतका नफा कमवला. हे जनतेचे रक्त शोषून मिळवलेले पैसे आहेत. हे शोषण कसे थांबवणार? जनता जागीच आहे, पण झोपलेले विरोधी पक्ष आता जागे झाले व त्यांनी ‘बंद’ पुकारला. ‘बंद’मध्ये शिवसेना का सामील होत नाही हा प्रश्न आता विचारला जाईल. आम्हाला महागाईत होरपळणार्‍या जनतेविषयी सहानुभूती आहे. आम्ही जनतेची बाजू नेहमीच मांडली. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले. विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. देशात लोकशाही आहे. जनतेची भावना मांडणारा विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करीत असेल तर त्यातच राज्याचे व देशाचे हित असते. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत? जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी यांना अटक

News Desk

MCA निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलारांची युती; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

महाराज…मठात जाऊन बसा, राजकारण तुमचे काम नाही !

News Desk