Site icon HW News Marathi

राज ठाकरेंनी देशपांडे, सरदेसाईंना का पुढे आणलं नाही?, शिवसेनेचा सवाल

 मुंबई | राजधानी दिल्लीमध्ये भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्री परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परिषदेत महाराष्ट्राकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. ज्यावरुन आता महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच शिवसेनेने सुद्धा यावरून राज्य सरकारला टोला लगावला आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी यावरुन टोला लगावला आहे. “दिल्लीत मुख्यमंत्री परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे, याचा अर्थ एकनाथ शिंदे हे केवळ नावालाच मुख्यमंत्री आहेत”, असं ट्विट मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केलं आहे. यासोबतच मनिषा कायंदेंनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटला सुद्धा उत्तर देत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला आहे.

भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या परिषद भाजपकडून आयोजित करण्यात आलेली, ज्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. तसेच या परिषदेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर उपस्थित होते. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. यानंतर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये कायंदे म्हणाल्या की, भाजपने मुख्यमंत्री बैठक बोलावली. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे हे केवळ नावालाच मुख्यमंत्री आहेत तर असा टोला कायंदे यांनी लगावला. तर दुसरीकडे शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी न सोडणारे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा टि्वटरद्वारे शिवसेनेवर बाण सोडलेलं, त्यालाही मनीषा कायंदेंनी सडेतोड उत्तर दिलंय.

खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार का, अशी चर्चा काही दिवासांपासून सुरू होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र राज ठाकरेंनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. अमित ठाकरे हे नव्या सरकारमध्ये मंत्री होणार नाहीत, असं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. तसंच राज ठाकरे यांनी शिवसेनेची सध्याची स्थिती आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेनेत फूट पडण्यासाठी उद्धव ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचं म्हंटलं. “खरी शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच संपली. उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचारांशी काही संबंध नाही”, असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही सूचक असं टि्वट केलं. “अब राजा वही बनेगा जो हकदार होगा,” असं टि्वट देशपांडे यांनी केलं आहे. त्याचसोबत राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक फोटो देखील देशपांडेंनी पोस्ट केला आहे. पण आता मनसेच्या या टीकेला मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कायंदे म्हणाल्या की, राज ठाकरे यांनी स्वतःच्या मुलालाच का राजकारणात पुढे आणलं?, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांना का पुढे आणलं नाही?, असा सवाल कायंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे हेच पुढे नेत आहेत, असंही कायंदे म्हणाल्या.

Exit mobile version